बालिकेसोबत लैंगिक चाळे; तरुणाला वीस वर्षांची सक्तमजुरी

ठाणे : पाणीपुरी खायला देण्याच्या अमिषाने सहा वर्षीय मुलीला घरात नेऊन तिच्यासोबत अश्लील चाळे करणाऱ्या तरुणाला पोक्सो न्यायालयाने 20 वर्षाच्या सक्त मजुरीची शिक्षा सुनावली आहे. या शिक्षेसोबतच न्यायाधीशांनी त्याला दहा हजार रुपयांचा दंड देखील ठोठावला आहे.

भाईंदर येथे राहणाऱ्या दिनेश मंडल नामक 34 वर्षीय तरुणाने 2021 मध्ये त्याच्या शेजारी राहणाऱ्या सहा वर्षीय मुलीला पाणीपुरी खायला देतो असे सांगून घरी नेऊन तिच्यासोबत अश्लील चाळे केले होते. दिनेश मुलीला त्याच्या घरी घेऊन गेला असल्याचे समजताच तिच्या आईने त्याच्या घरी जाऊन पाहिले असता मुलीच्या हातात तिला 20 रुपये दिसले. तिच्या आईला संशय आल्याने तिने मुलीला घरी आणल्यानंतर काय झाले ते विचारले असता तिने दिनेश अंकलने काय केले ते आईला सांगितले. त्यानंतर तिने भाईंदर पोलीस ठाण्यात पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला.

या गुन्ह्याची अंतिम सुनावणी बुधवारी (ता.12) ठाणे जिल्हा सत्र न्यायालयाचया विशेष पोक्सो न्यायालयात झाली असता विशेष सरकारी वकील रेखा हिवराळे यांनी न्यायालयात सादर केलेल्या भक्कम साक्षी पुराव्याच्या आधारे विशेष पोक्सो न्यायाधीश डी. एस. देशमुख यांनी दिनेशला 20 वर्षांची सक्तमजुरी आणि 10 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.