मुंबई: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसमध्ये मोठे बदल पाहायला मिळत आहेत. नाना पटोले यांच्याकडून प्रदेशाध्यक्षपद काढून घेण्यात आले आहे. आता महाराष्ट्र काँग्रेसची धुरा तळागाळातून आलेल्या हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर असणार आहे.
हर्षवर्धन सपकाळ यांनी जिल्हा परिषद सदस्यपदापासून आपला प्रवास सुरु केला. आज त्यांच्यावर काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. यापूर्वी राष्ट्रीय राजकारणात देखील मोठी जबाबदारी सांभाळलेली आहे.
हर्षवर्धन सपकाळ हे काँग्रेसचे माजी आमदार आहेत. 2014 ते 2019 ते बुलढाण्याचे आमदार होते. 2019 मध्ये त्यांना पुन्हा तिकीट मिळालं होतं, पण त्यांना पराभवाला सामोरं जावे लागले आहे. सपकाळ यांनी आमदारकीच्या काळात जलसंधारण व्यवस्थापनाचा प्रकल्प मतदारसंघात राबवला होता. हर्षवर्धन सपकाळ सध्या काँग्रेसच्या राजीव गांधी पंचायत राज संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. महात्मा गांधी आणि विनोबा भावे यांच्या विचारधारेवर आधारित ग्रामस्वराज्य निर्मितीत सपकाळ यांची महत्त्वपूर्ण भूमिका होती. त्यांना ग्राम स्वच्छता अभियान आणि आदर्श ग्राम चळवळीत सक्रिय सहभागाचा अनुभव आहे.
हर्षवर्धन सपकाळ यांची राजकीय कारकीर्द जिल्हा परिषद सदस्य ते आमदार अशी तळागाळातून पुढे आली आहे. 1999 ते 2002 या काळात ते जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते. 14-15 वर्षे राहुल गांधी यांच्या कोअर टीममध्ये काम केले. राज्यातील काम पाहून राहुल गांधींनी त्यांना दिल्लीला बोलावून घेतलं.