अवकाळी पावसामुळे हापूस आंब्याचे उत्पादन घटणार

नवी मुंबई: अवकाळी पावसाचा कोकणाला फटका बसला असून आंब्याचा मोहोर काळा पडला आहे. त्यामुळे यंदा हापूसचे उत्पादन १० ते १५ टक्क्यांनी घटण्याची शक्यता येथील शेतकऱ्यांनी वर्तवली आहे.

हापूस आंब्याच्या पिकासाठी कोकण प्रसिद्ध आहे. त्यामुळे कोकणात यंदा आंबा उत्पादनाला अनुकूल वातावरण असल्‍याने आंबा मोहोर लवकर फुटला होता. त्यामुळे आंबा बागायतदारांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्‍या, मात्र अवकाळी पावसाने मोहोराला फटका बसला आहे. आंब्यावर काहीसा बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव वाढल्‍याने मोहोर काळा पडत चालला आहे. त्यामुळे पीक घटणार असल्याने येथील शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.

कोकणात अजूनही हवी तशी थंडी पडली नाही. त्यामुळे आता परत नवीन कोंब फुटण्यास सुरुवात झाली आहे. डिसेंबरअखेर आणि जानेवारीत जर चांगली थंडी पडली तर आंबा पिकाला पोषक वातावरण तयार होऊन आंबा पीक चांगले निघण्याची शक्यता आहे, अशी माहिती देवगड येथील आंबा बागायतदार संकेत पुजारे यांनी दिली.