कायमस्वरुपी नेमणूक करत कंत्राटी शिक्षकांची दिवाळी केली गोड

नवी मुंबई: मनपाच्या विविध शाळांमध्ये कार्यरत असणाऱ्या कंत्राटी शिक्षकांना कायमस्वरुपी नेमण्यास शासनाने मान्यता दिल्याने या शिक्षकांना दिवाळी भेट मिळाली आहे.

माध्यमिक आणि प्राथमिक शाळांमध्ये कार्यरत असणाऱ्या कंत्राटी ५० शिक्षकांना कायम करण्यासाठी आयुक्त राजेश नार्वेकर यांनी राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठविला होता. या प्रस्तावाला राज्य सरकारने मंजुरी दिल्याने २९ माध्यमिक तर २१ प्राथमिक शाळांतील शिक्षकांना कायमस्वरूपी मनपाच्या आस्थापनेवर सामावून घेण्यात आले आहे. मनपाच्या आकृतीबंध मंजूर असलेल्या रिक्त पदांवर या शिक्षकांना सामावून घेण्यात आले आहे.
पदस्थापना केल्यावर या शिक्षकांना वेतन लाभ लागू करण्यात येणार असून, इतर सुविधा देखील पदस्थापना केल्यावर लागू करण्याच्या नियम अटी-शर्तीनुसार शासनाने ही मंजुरी दिली आहे. कायमस्वरुपी नेमणूक करताना या शिक्षकांच्या शैक्षणिक निकष प्रशासनाने तपासून पाहणे आवश्यक असल्याचे शासनाने आदेशात नमूद केले आहे. मनपाच्या आस्थापनेवरील शिक्षण विभागात आता या शिक्षकांना आकृतीबंधात मंजूर असलेल्या नियमांनुसार वेतन लाभ आणि इतर सुविधा मिळणार आहेत. पूर्वी या कंत्राटी शिक्षकांना ठोक वेतन मिळत होते. मात्र आता सर्व लाभ मिळणार आहेत.