एमएसआरडीसीपुढे हात टेकले; रस्त्याची चाळण,कंबरडे मोडले

शहापूर-सापगाव-कोळकवाडी रस्त्यासाठी उभी राहतेय लोकचळवळ

शहापूर: महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अधिपत्याखाली मागील आठ वर्षांपासून सुरु असलेल्या शहापूर तालुक्यातील जनतेचे कंबरडे मोडलेल्या शहापूर-सापगाव-कोळकवाडी हा प्रलंबित असलेला रस्ता वापरायोग्य व्हावा या मागणीच्या पूर्ततेसाठी एमएसआरडीसी प्रशासनापुढे राजकीय हस्तक्षेपही व्यर्थ ठरत असल्याने अखेर तालुक्यातून या रस्त्यासाठी लोकचळवळ उभी राहत आहे.

शहापूर-मुरबाड-म्हसा- पाटगाव-कर्जत ५४८- ए या राष्ट्रीय महामार्गाचे रुंदीकरण व मजबुतीकरण करण्याचे काम पी.एस.के.इन्फ्रा आणि प्रा.लिमिटेड कंपनी २०१८ पासुन करत असून एमएसआरडीसी प्रशासनाची अनास्था आणि ठेकेदाराच्या अनागोंदी कारभारामुळे तब्बल आठ वर्षानंतरही या महामार्गाचे काम पूर्णत्वास येऊ शकले नाही. पर्यायाने या महामार्गावरील शहापूर-सापगांव – कोळकवाडीपर्यंतच्या अपूर्ण रस्त्याने नागरिकांचे अक्षरश: कंबरडे मोडले आहे. दरम्यान या विरोधात २०१९ पासून अनेक सामाजिक संघटना, राजकीय (विरोधी) पक्ष,सामाजिक कार्यकर्ते यांनी तक्रारीवजा निवेदने देऊन व प्रसार माध्यमांनी अनेकदा वस्तुस्थिती मांडूनही कार्यवाही होऊ शकली नसल्याने आता जागृत आणि संवेदनशील नागरिकांमधून याच रस्त्याविरोधात एक निष्पक्ष लोक चळवळ उभी राहत आहे.

शहापूर-मुरबाड मार्गावरील शहापूर-सापगांव ते कोळकवाडी या रस्त्यावर गेल्या आठ वर्षांपासून मोठ-मोठे खड्डे पडत आहेत. त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. या अपघातामध्ये आजपर्यंत १४ नागरिकांचा बळी गेला तर २० पेक्षा जास्त पुरुष-महिला भगिनी अपघातात जखमी झाल्या आहेत. या मार्गावरून तालुक्यातील ७० टक्के प्रवासी जीव मुठीत घेऊन प्रवास करत असतात. आतापर्यंत बहुतांश संघटना, सामाजिक कार्यकर्ते यांनी प्रशासनाला वारंवार तक्रारी करूनही कोणतीही ठोस उपाययोजना केलेली नाही. दरवर्षी तात्पुरती डागडूजी करुन शासनाच्या निधीचा चुराडा केला जातो. या अनुषंगाने संघर्ष समितीने सार्वजनिक नि:पक्ष आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.

जनतेने आपल्या सुरक्षेसाठी आणि हक्कासाठी या लढ्यात सहभागी होण्याचे आवाहन या समितीने केले आहे. दरम्यान या आंदोलनामुळे लोकप्रतिनिधिंच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. या रस्त्यावरून प्रवास करतांना मागील आठ वर्षांपासून जनतेने असंख्य यातना भोगल्या आहेत. प्रवासादरम्यान १४ निष्पाप नागरिकांचा बळी गेला आहे. २० पेक्षा जास्त पुरुष व महिला भगिनी जखमी झाल्या आहेत. या नादुरुस्त रस्त्यामुळे जनतेच्या वाहनांची अक्षरशः वाट लागली आहेच, शिवाय बहुतांश वाहनचालकांना कमरेचा त्रासही सुरु झाला आहे. किंबहुना या रस्त्याने प्रवास करणारे वाहनचालक, आबाल-वृद्ध,शालेय विद्यार्थी, महिला भगिनी, गरोदर माता मागील आठ वर्षांपासून मरण यातना भोगत आहेत. उन्हाळ्यात रस्त्यावर धुळीचे साम्राज्य पसरलेले असते. यामुळे नागरिक श्वसनाच्या त्रासाने ग्रस्त आहेत. पावसाळ्यात चिखल तुडवत इच्छित स्थळ गाठावे लागते. शिवाय हा खड्ड्याचा रस्ता पार करुन जातांना कामावर वेळेत पोहचण्यास उशिर होत असल्याने असंख्य चाकरमान्यांना लेटमार्कचा सामना करावा लागत आहे.