मुंब्र्यात गुरू-शिष्य झुंजणार; सामन्याआधीच कार्यकर्ते भिडणार

नजीब मुल्ला यांच्यापुढे आव्हाड फौजेचे आव्हान

ठाणे : आमदार जितेंद्र आव्हाड यांचे एकेकाळचे कट्टर समर्थक म्हणून ठाण्याच्या राजकारणात घट्ट पाय रोवणारे माजी नगरसेवक नजीब मुल्ला आता गुरू विरोधात निवडणूक लढवण्यासाठी सज्ज झाले आहेत. आव्हाड यांच्या कळवा- मुंब्रा विधानसभा मतदारसंघातून मुल्ला यांनी मतदारांची बांधणी करण्यास सुरूवात केली आहे. मात्र आव्हाड समर्थक आक्रमक झाले असून नजीब मुल्ला यांना चितपट करण्याची रणनिती आखली जात आहे.

महाविकास आघाडी आणि महायुती मधिल जागा वाटपाचा तिढा सुटलेला नाही. पण काही मतदारसंघांच्या बाबतीत एकमत झाल्याचे समजते. यामध्ये कळवा- मुंब्रा मतदारसंघाचा समावेश आहे. आमदार जितेंद्र आव्हाड या मतदारसंघातून सलग तीनवेळा निवडून आले आहेत. कळव्यात भुमीपूत्र, मराठी आणि हिंदू समाजाची लोकवस्ती तर मुंब्रा हा मुस्लिम बहूल परिसर. अशा परिस्थितीतही आव्हाड यांनी हिंदू व मुस्लिम समाजाला सोबत घेऊन हा मतदारसंघ बांधला आहे. येथील रस्त्यांपासून ते अनेक प्रकल्प राबवत त्यांनी या मतदारसंघाचा विकास केला आहे. म्हणूनच राज्यात आघाडी असो व युती वारे कोणत्याही दिशेने वाहत असले तरी आव्हाड यांचे कळवा- मुंब्य्रातील स्थान भक्कम राहिले आहे. या जोरावरच ते चौथ्यांदा निवडणुकीला सामोरे जात आहेत. पण यावेळी त्यांची लढाई सोपी जाणार नाही. कारण यावेळी त्यांच्यासमोर प्रतिस्पर्धी म्हणून एकेकाळी त्यांचे शिष्य असलेले नजीब मुल्ला महायुतीतील राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून उभे राहतील हे जवळपास निश्चित झाले आहे. पक्षाने त्यांना कामाला लागण्याची सुचना देताच मुल्ला यांनी कळवा- मुंब्य्रात आपला संपर्क वाढवला आहे. येथील कार्यकत्यांना गाठीभेटी देणे, मतदार बांधण्यासाठी मतदारसंघ ते पिंजून काढत आहेत.

नजीब मुल्ला यांना राजकारणात आणण्याचे श्रेय खरेतर जितेंद्र आव्हाड यांनाच जाते. विद्यार्थी असताना काँग्रेसचा कार्यकर्ता असलेला नजीब यांनी जितेंद्र आव्हाड यांच्याशी जवळीक वाढवली. पुढे राष्ट्रवादी पक्षाची स्थापना झाल्यानंतर आव्हाड यांनी राजकीय प्रगती साधण्यास सुरुवात केली. अशावेळी त्यांनी सोबत असलेल्या नजीब मुल्ला यांना २० वर्षांपूर्वी ठाणे पालिकेच्या राबोडी प्रभागातून नगरसेवक पदाचे तिकिट दिले. त्यांच्या विजयासाठी मेहनत घेतली आणि मुल्ला यांना निवडून आणले. त्यानंतर ठाणे पालिकेत विरोधी पक्षनेता, स्थायी समिती सदस्य, गटनेता अशी अनेक पदे दिली.

दोस्तीचे रुपांतर शत्रूत्वात झाल्यानंतर त्याचा पुरेपूर फायदा घेण्याचा प्रयत्न मध्यंतरी शिवसेना शिंदे गटाने केला. नजीब मुल्ला यांच्या वाढदिवसाला भर व्यासपीठावर खासदार नरेश म्हस्के यांनी मुल्ला यांना आमदार होण्याच्या शुभेच्छा दिल्या होत्या. आता या शुभेच्छा प्रत्यक्षात सत्यात उतरवण्यासाठी नजीब मुल्ला पूर्ण ताकदीने निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. या भागात राष्ट्रवादीचे कार्यालय उभारून नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या जात आहेत. त्यांना आर्थिक रसद देखील पुरवली जात आहे. मात्र असे असले तरी मुंब्रा जिंकणे मुल्ला यांना तितके सोपे नाही. आव्हाडांनी केलेल्या विकासकामांमुळे येथील मतदारांची साथ त्यांना आहे. इतकेच नव्हे तर बहूतेक पदाधिकारी व कार्यकर्तेही आव्हाड यांच्या बाजूने अजूनही आहेत. निवडणुकीदरम्यान या निष्ठावंतांना ‘बांधून’ ठेवण्याचे कसब आमदार आव्हाड यांना साधावे लागणार आहे. पण सध्यातरी नजीब मुल्ला यांचे मनसुबे उधळण्याची एकही संधी कार्यकर्ते सोडत नसल्याचे नुकत्याच झालेल्या राड्यामुळे समोर आले आहे.

११ ऑक्टोबरला मुंब्रा येथिल संजयनगर आणि अमृतनगर येथील विकास कामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण करण्यासाठी नजीब मुल्ला गेले असता तेथे आव्हाड समर्थक शानू पठाण आणि या भागातील कार्यकर्त्यांनी प्रखर विरोध केला. आव्हाड समर्थक कार्यकर्त्यांनी हा डाव उधळून लावण्यासाठी गनिमी कावा केला. शेवटी पोलिस बंदोबस्त वाढावावा लागला होता. त्यामुळे आमदार जितेंद्र आव्हाड आणि नजीब मुल्ला यांच्यामध्ये या मतदारसंघात लढत झाली तर राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाच्या कार्यकत्यांमधील राडेबाजी रोखण्याचे मोठे आव्हान पोलिस यंत्रणेपुढे असेल राष्ट्रवादीत गणेश नाईक आणि वसंत डावखरे असे दोन शक्तीशाली गट असताना नजीबच्या सहाय्याने आव्हाड यांनीही आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आव्हाड- मुल्ला असे समिकरण तयार झाले. पण गेल्या वर्षभरात या दोघांमधील नाते तुटले. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर आव्हाड यांनी शरद पवारांची साथ सोडली नाही. तर आव्हाडांनतर अजित पवार यांच्याशी जवळीक वाढल्याने मुल्ला यांनी त्यांना साथ देणे पसंत केले.