शहरे जिंकली, खेड्यांतही गुलाल
महाविकास आघाडीचा दारुण पराभव
एकूण जि.प. १२
भाजप ०८
शिंदे गट ०२
राष्ट्रवादी ०२
ठाणे: महापालिका आणि नगर परिषदांच्या विजयानंतर भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाने नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीत ऐतिहासिक विजय नोंदवत महाविकास आघाडीतील घटक पक्षांना अस्मान दाखवले.
शहरी मध्यमवर्गीयांचा पक्ष अशी भाजपची हेटाळणी दोन दशकांपूर्वी केली जात होती. मात्र आता राज्यातील १२ जिल्हा परिषद आणि त्या अंतर्गत येणाऱ्या १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकीतही भाजपने प्रथम क्रमांक मिळवला.
सायंकाळी उशिरापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार १२ जिल्हा परिषदांतील ७३१पैकी ७२१ जागांचा निकाल हाती आला असून त्यापैकी भाजपला २४२, शिवसेना शिंदे गट १५७, राष्ट्रवादी अजित पवार गट १६०, ठाकरे गट ४६, काँग्रेस ५८ आणि शरद पवार गटाला २१ जागा मिळाल्या. एकूण १२ पैकी आठ जिल्हा परिषदांवर भाजपचे कमळ फुलले असून शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार यांनी प्रत्येकी दोन जिल्हा परिषदा ताब्यात ठेवल्या. महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेसला एकाही जिल्हा परिषदेवर सत्ता मिळवता आली नाही. पंचायत समित्यांच्या १४६२ जागांपैकी ११०६ जागांपैकी भाजप ३९७, शिवसेना शिंदे गट २१९, राष्ट्रवादी अजित पवार गट २३४, ठाकरे गट ९२, काँग्रेस ३८ तर शरद पवार गटाला ४४ जागांवर विजय मिळवता आला. १२५ पंचायत समित्यांपैकी भाजपला ५१, शिवसेना शिंदे गट ३२, राष्ट्रवादी अजित पवार गट २८, ठाकरे गट पाच, काँग्रेस सात आणि शरद पवार गटाला फक्त दोन पंचायत समित्यांवर विजय मिळवता आला.
जिल्हा परिषदेचे वर्णन छोटे मंत्रालय असे केले जाते. सामान्य कार्यकर्त्याच्या दृष्टीने याचे महत्त्व अधिक आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे राज्यातील प्रमुख नेत्यांनी यात फारसा प्रचार केला नाही. गेले दशकभर भाजपने बाहेरील कार्यकर्त्यांना पक्षात प्रवेश देत ताकद वाढवली. त्याला राज्यातील सत्तेचे बळ मिळाल्याने भाजपने पश्चिम महाराष्ट्रातील साखर पट्ट्यात पुणे वगळता अन्य जिल्ह्यांत प्रथमच कमळ फुलवले. विशेषत: सातारा, सोलापूर या जिल्ह्यांमध्ये भाजपने स्पष्ट बहुमत मिळवत, राष्ट्रवादीला धक्का दिला.
पंचायत समिती, जिल्हा परिषदांमध्ये सत्ता असेल तर, विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत यश मिळवणे सोपे जाते असे राजकीय गणित आहे. जिल्हा परिषद ही सत्तेची प्राथमिक शाळा आहे. तेथून कार्यकर्ते घडतात. आजचे अनेक आमदार हे जिल्हा परिषदेत किंवा महापालिकांमध्ये काम करून पुढे आले आहेत. त्या दृष्टीने भाजपने जी आगेकुच सुरू ठेवली त्याला महत्त्व आहे. यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाचा वाटा मोठा आहे.
एकूणच विधानसभा निकालानंतर राज्यात विरोधक गलीतगात्र होत असल्याचे या १२ जिल्हा परिषदांच्या निकालातून दिसले. आता उर्वरित २२ जिल्हा परिषद निवडणुका कधी होणार याकडे लक्ष असेल. ओबीसी आरक्षणामुळे या निवडणुकांची प्रतीक्षा आहे. त्यात विदर्भ, उत्तर महाराष्ट्रातील प्रमुख जिल्हा परिषदा आहेत.