नवी मुंबईतील विविध विकास प्रकल्पांचे भूमिपूजन आणि लोकार्पण
नवी मुंबई: नवी मुंबईतील १२२५ कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचे भूमिपूजन आणि २४८ कोटी रुपयांच्या कामांचे लोकार्पण शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आणि आमदार गणेश नाईक, ठाण्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, माजी खासदार संजीव नाईक, आमदार मंदा म्हात्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत ऑनलाईन करण्यात आले.
यावेळी नवी मुंबई क्षेत्र विकासाचे ग्रोथ सेंटर असल्याचे सांगून नवी मुंबईसह संपूर्ण एमएमआर क्षेत्रात एक ट्रिलियन अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट साध्य करण्याची क्षमता असल्याचे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मांडले. या ऑनलाईन कार्यक्रमास नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त राजेश नार्वेकर यांच्यासह लोकप्रतिनिधी, मंत्री, आयुक्त आणि वरिष्ठ शासकीय अधिकारी उपस्थित होते.
नवी मुंबईतील सीसीटीव्ही यंत्रणेसह कमांड सेंटर, सेक्टर १८ सेवूड नेरुळ येथील ज्येष्ठ नागरिक काळजी केंद्र इमारत, शाळा, अग्निशमन केंद्र, ग्रंथालय आदींचे लोकार्पण करण्यात आले. घणसोली-ऐरोली खाडीपूल, अमृत योजनेतील कामांचे, भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्र येथे १५० दलली क्षमतेचे फिल्टर बेड बांधणे या कामांचे भूमिपूजन करण्यात आले. यांत्रिकी पद्धतीने रस्त्याची साफसफाई करण्याच्या कामांचा शुभारंभ झाला. ऐरोलीतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा शिलान्यास व करण्यात आला. या पुतळ्यासाठी लोकनेते आमदार गणेश नाईक यांनी ५० लाख रुपयांचा निधी दिला आहे. सेक्टर १५ घणसोली येथील शाळा, सेक्टर १४ कोपरखैरणे येथील नागरी आरोग्य केंद्र, सेक्टर ३ ऐरोली येथील अग्निशमन केंद्र इमारत, विष्णुदास भावे नाट्यगृह वाशी येथील ग्रंथालय या वास्तूंचे लोकार्पण करण्यात आले.