१७७० पदांसाठी होणार भरती
ठाणे: मागिल अनेक वर्षे रखडलेली ठाणे महापालिकेतील कर्मचाऱ्यांची मेगा भरती अखेर मार्गी लागण्याची चिन्हे आहेत. या महिन्यात महापालिका तब्बल १७५०जागांची जाहिरात प्रसिद्ध करणार असून गणपतीनंतर टाटा कन्सल्टन्सीच्या माध्यमातून परीक्षा घेणार आहे. दिवाळीपर्यंत टप्प्या-टप्प्याने नियुक्तीपत्र देण्यात येणार आहेत. महत्वाचे म्हणजे लिपिक पदाची एकही जागा या भरतीमध्ये नसेल.
राज्य सरकारने महाराष्ट्रातील सरकारी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमधील रिक्त जागा भरण्यासाठी मोहीम सुरू केली आहे. त्यामुळे ठाणे पालिकेतील रिक्त पदांची भरती करण्यासही हिरवा कंदिल मिळाला आहे. त्यानुसार ठाणे महापालिकेच्या ४,५०० रिक्त जागांपैकी १७३८ जागा भरल्या जाणार होत्या. मात्र हा अध्यादेश निघाल्यानंतर निवृत्त होणार्या कर्मचार्यांची पदेही रिक्त झाल्याने ठाणे महापालिकेने आता १७७० पदांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे.
यामध्ये सर्वाधिक भरती ही आरोग्य विभागात होणार आहे. याशिवाय अभियांत्रिकी, अग्निशमन दलात कर्मचारी भरती होणार आहे. ही भरती प्रक्रीया लवकर मार्गी लावावी यासाठी पालिका प्रयत्नशिल आहे. पण मध्यंतरी झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमुळे सहा महिने भरती रखडली. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आहेत. पण त्याआधी ही भरती प्रक्रीया मार्गी लावण्याच्या हालचालींना वेग आला आहे. पालिकेच्या वरिष्ठ अधिकार्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार ऑगस्टच्या दुसर्या किंवा तिसर्या आठवड्यात भरतीसंदर्भात जाहिरात वर्तमानपत्रे आणि पालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध होईल. गणपतीनंतर थेट परीक्षा होऊन दिवाळीपर्यंत टप्प्या टप्प्याने नवीन कर्मचार्यांना रुजू करण्यात येणार आहे. त्यामुळे ठाणे महापालिकेच्या अस्थापनेवर काम करण्याची इच्छा असणार्या तरुणांना ही सुवर्णसंधी असणार आहे.
भरती प्रक्रिया राबविण्यात येत असताना कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप होऊ नये यासाठी खासगी संस्थेकडे ही प्रक्रिया सोपविण्यात येणार आहे. ठाणे महापालिकेतील भरती प्रक्रिया टाटा कन्सल्टन्सीमार्फत राबविण्यात येणार आहे. उमेदवारांना अर्ज सादर करावे लागणार आहेत. ऑनलाइन परीक्षा घेतली जाणार आहे, मुलाखती मात्र घेतल्या जाणार नसल्याचे बोलले जात आहे. त्या-त्या पदाकरिता उमेदवारी अर्ज सादर झाल्यानंतर त्याची छाननी देखील टाटा कन्सल्टन्सी करणार असल्याने या भरती प्रक्रियेत ठाणे महापालिकेतील अधिकारी, माजी पदाधिकारी आणि माजी नगरसेवकांना हस्तक्षेप करता येणार नाही, असे एका वरिष्ठ अधिकार्याने सांगितले.
पालिकेला ‘कारकून’ नकोत
ठाणे महापालिकेने आधी लिपिक पदासाठी ३०० पदांची भरती जाहिर केली होती. पण आता १७७० कर्मचार्यांच्या मेगा भरतीमध्ये ‘कारकून’ म्हणजेच लिपिक जागा नसेल. सफाई कर्मचार्यांच्या वारसा हक्काने लागणार्या शिक्षित तरुणांना आणि वाहन चालकांना पालिकेने लिपिक पदावर भरती केली आहे. लिपिक पदांचा कोटा भरला असल्याने आता या पदासाठी भरती होणार नसल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे. त्यामुळे भरती प्रक्रीयेत सर्वाधिक लिपिक पदासाठी इच्छूक असणार्या उमेदवारांचा हिरमोड होणार आहे.
कुठे किती पदे
पालिकेत कार्यकारी अभियंत्यांची ५ पदे, उपनगर अभियंत्यांची सात पदे, कनिष्ठ अभियंत्यांची (नागरी) ७७ आणि कनिष्ट अभियंत्यांची ६६ अशी १६५ पदे रिक्त आहेत. आतापर्यंत ६८ पदे भरली गेली आहेत. मात्र ३८२ रिक्त पदांवर भरती होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे पहिल्या टप्यात १८० फायरमन कायमस्वरुपी घेण्यात येणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली. आरोग्य विभागात २५० परिचारिका, सुमारे ८०० वैद्यकीय अधिकारी पदे भरण्यात येणार आहेत. या विभागात सर्वाधिक पदांची भरती होणार आहे. याशिवाय प्रदूषण विभागातीलही रिक्त पदे भरली जाणार आहेत.