आला राग, टाक पोस्ट!

गेल्या काही दिवसांपासून जे वृत्त वाहिन्यांचे नियमित प्रेक्षक आहेत त्यांना अस्वस्थ करणारे ‘असे’ एक तरी दृश्य पाहण्याची पाळी येत आहे. कोणीतरी कोणाला तरी मारतोय, एखादा जमाव पोलिसांच्या पथकावर हल्ला करतोय, पोलीसही लाठीमार करीत जमावाला पांगवण्याचा प्रयत्न करीत आहेत, किंवा रक्तबंबाळ झालेली व्यक्ती जीवाच्या आकांताने झालेल्या हल्ल्याचा निषेध करीत आपले म्हणणे मांडत आहे. ही दृश्ये अन्य कोणत्या राज्यातील नसून आपल्या तथाकथित सुसंस्कृत महाराष्ट्राची आहेत. यापैकी बहुतांशी दृष्ये ही राजकीय संघर्षाची असून फार कमी प्रमाण गुन्हेगारी स्वरूपाची आहेत. थोडक्यात गुन्हेगारांना मागे टाकण्याचे काम आपल्या राजकीय कार्यकर्त्यांनी केले आहे. इतकी ही खूनशी वृत्ती कशी निर्माण होते, याचा शोध घेताना सर्वसामान्यपणे समाजाचा संपत चाललेला संयम हे कारण असल्याचा निष्कर्ष काढता येऊ शकेल. तो संपण्याचे कारण समाजात वाढत चाललेला विसंवाद आणि लोकशाहीच्या नावाखाली व्यक्ती स्वातंत्र्याचा अतिरेक हा तर्क निघतो.

माहिती तंत्रज्ञान इतके झपाट्याने विकसित होत असताना आणि त्याद्वारे संवाद साधण्याची माध्यमे जन्माला येत असताना समाज जोडण्याचे काम होण्याऐवजी ते तोडण्याचे काम कसे काय सुरू राहू शकते? याचे साधे सोपे कारण म्हणजे या माध्यमांचा सातत्याने होणारा दुरुपयोग. गेल्या काही दिवसांत समाज माध्यमांवरील मजकुराने अक्षरशः हैदोस घातला असून कोणीही कोणावरही मागचा पुढचा विचार न करता टीकाटिपणी करू लागला आहे. त्यात चारित्र्यहननापासून चुकीची माहिती देऊन वातावरण गढूळ करण्याचे असंख्य प्रकार अक्षरशः अहोरात्र सुरू आहेत. पूर्वी फावल्या वेळेत लोक काही छान वाचायचे, वाचलेल्या मजकुरावर साधक बाधक चर्चा करायचे. माहितीची देवाण-घेवाण व्हायची. नवनवीन माहिती गोळा करून आपली निर्णयक्षमता टोकदार करण्याचे काम होत असे. आता ही उद्दिष्टे पडद्याआड गेली आहेत. कोण किती वादग्रस्त आणि भावना भडकवणाऱ्या कॉमेंट टाकतो याची स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेमागे नेत्याबद्दल वा पक्षाच्या बदनामीची चिंता असण्यापेक्षा आपले राजकीय भवितव्य कसे सुरक्षित होऊ शकेल हा स्वार्थ असतो. त्यामुळे पूर्वी नेत्यांच्या सांगण्यावरून मारामारी करणारे हात आता हाताशी असलेल्या मोबाईलवरून शाब्दिक सुरुंग पेरण्याचे काम करू लागले आहेत. जो मोठा धमाका करेल त्याला मोठे बक्षीस असा अलिखित समझोता झाल्यामुळे आरोप, त्याची भाषा आणि सरते शेवटी होणारे परिणाम याची तमा बाळगणे कार्यकर्त्यांनी सोडून दिले आहे.

राजकारण्यांना अशा तमाशाची सवय असते, किंबहुना तो त्याचा अविभाज्य भाग बनलेला आहे. परंतु त्याचा सर्वसामान्यांवर काय परिणाम होतो, समाजस्वास्थ्य बिघडते, चुकीचे संकेत आणि आदर्श निर्माण होतात याचा किंचितही विचार होत नाही, याची खंत वाटते. सर्वसामान्य जनतेला गृहीत धरण्याचा अधिकार आपल्याच राजकारण्यांना कोणी दिला की तो त्यांनी अन्य नसलेल्या अधिकाराप्रमाणे हिरावून घेतला आहे?

चित्रपट अथवा नाटक न पाहता ते बंद पाडणे, पुस्तक न वाचता त्याची होळी करणे किंवा एखाद्या घटनेची सत्यता न पटवता त्यावरून सोशल मीडियावर कमेंट करणे ही सारी लक्षणे लोकशाहीची झुंडशाही करण्याचा दिशेने सुरू असलेले मार्गक्रमण म्हणावे लागेल. यामुळे सर्वसामान्य माणूस राजकारणापासून दुरावला जाऊ शकतो. आज अनेकांनी वर्तमानपत्रे असो की वृत्तवाहिन्या, यावर बहिष्कार टाकावा इतकी अलिप्तता बाळगायला सुरुवात केली आहे तेच नागरिक मतदान केंद्रांकडे पाठ फिरवू शकतात.

अर्थात हे लक्षात न घेता जुलाब झाल्यागत बेजबाबदार कॉमेंट्सचा अतिसार सुरू आहे. लोकशाही ज्यामुळे क्षीण होत आहे हे कोणी लक्षात का घेत नाही? तुम्हाला राग येत असेल तर त्याला जरूर वाचा फोडा, पण त्याची भाषा, परिणाम आदीचाही विचारही करा. बाय द वे, आज जे अचानक ॲक्टिव्ह झाले आहेत त्यांना पूर्वी राग येत असणारच की….. तेव्हा ते काय करीत होते हो?