ठाणे: दिवाळीनिमित्त दरवर्षीप्रमाणे ठाण्यातील प्रशांत कॉर्नरमध्ये यंदा देखील सोन्याचा वर्ख असलेली मिठाई ग्राहकांसाठी उपलब्ध आहे. मात्र यंदा या मिठाईची किंमत 50 हजार रुपये किलो इतकी आहे. हा दर सर्वांनाच परवडणारा नसल्याने नगावर ही मिठाई यंदा विकली जात आहे.
यंदा सोन्याचा दर एक लाख 34 हजारांवर पोहचला आहे, तरीही ठाण्यातील सुप्रसिद्ध प्रशांत कॉर्नर यांनी यंदा देखील 24 कॅरेट सोन्याचा वर्ख असलेली मिठाई बाजारात आणली आहे. ममरा बदाम, काश्मिरी केसर, पिस्ता यासारखे अतिउत्तम जिन्नस वापरून तयार केलेली ही मिठाई 8, 12, 18 आणि 24 नगामध्ये उपलब्ध केली आहे. 50 हजार रुपये किलो इतकी किंमत या मिठाईची ठेवली आहे. मिठाईची किंमत जास्त असली तरीही ग्राहक त्याला पसंती देत आहेत. आकर्षक पेटीमध्ये वेष्टित केलेली ही मिठाई ठाणेकरांच्या पसंतीस येत असून अनेक ग्राहक ही मिठाई घेत आहेत. लाडू, पेढे, बर्फी, गुलाबजाम, हलवा यासारख्या नेहमीच्या पदार्थांसोबतच नारळीपाक आणि नारळाची बर्फी हे दोन विशेष प्रकार यावर्षी विक्रीस ठेवले आहेत. भारताच्या प्रत्येक प्रांतातील व्यक्तींना आपल्या आवडीची मिठाई मिळावी यासाठी राजस्थान, मध्यप्रदेश या भागात विशेष पसंत केली जाणारी घेवर देखील ठाणेकरांसाठी उपलब्ध केली आहे. शुद्ध तुपातील घेवर आणि इतर मिठाई बनवण्यासाठी प्रशांत कॉर्नर यांचं स्वतंत्र स्वयंपाकगृह असून सर्व मिठाई इथंच बनवल्या जातात. तसंच ठाणेकरांसाठी माफक दरात उपलब्ध करून दिल्या जातात. यावर्षीचं आकर्षण म्हणजे स्पेशल ड्रायफ्रूट, नमकीन आणि इतर अनेक वस्तूंनी सजलेला गिफ्ट हँपरदेखील प्रशांत कॉर्नरतर्फे उपलब्ध केलं आहे,” असं दुकानाचे व्यवस्थापक हरीश बोबडे यांनी सांगितलं.
भारतातील अत्यंत महागड्या समजल्या जाणाऱ्या पॅकिंग कंपन्यांचं आकर्षक पॅकिंग हे या मिठाईचं वैशिष्ट्य आहे. सोबतच आंतरराष्ट्रीय दर्जा असलेला सुका मेवा वापरून गिफ्ट पॅक केले जातात. सोन्याची मिठाई यांचं पॅकिंग हेच ग्राहकांच्या पसंतीला उतरत आहेत. मिठाई खाऊन झाल्यावर पुन्हा या पॅकिंगचा वापर करता येतो. त्यामुळं हे आकर्षक पॅकिंग या मिठाईच्या विक्रीचा मुख्य आकर्षण आहे.
आयकर विभागाच्या बारीक नजरा : आयकर विभाग ही मिठाई खरेदी करणाऱ्या ग्राहकांवर बारीक लक्ष ठेवून असतो. त्यामुळं एवढी महाग मिठाई विकत घेणाऱ्या ग्राहकांना विशेष खबरदारी देखील घ्यावी लागते. या ठिकाणी होणारे व्यवहार हे रोख, ऑनलाइन पेमेंट आणि चेक स्वरूपात होतात.