हरियाणात झालेल्या विशेष राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत १०० मीटरमध्ये सुवर्ण तर भालाफेकमध्ये कांस्य पदक
ठाणे: दृढनिश्चय, कष्ट आणि आत्मविश्वासाच्या बळावर ठाण्याच्या मयुरेश कोटियनने विशेष राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत इतिहास घडवला आहे. हरियाणा येथे १ ते ७ फेब्रुवारीदरम्यान पार पडलेल्या राष्ट्रीय अजिंक्यपद क्रीडा स्पर्धेत मयुरेशने १०० मीटर धावण्यात सुवर्णपदक पटकावत सर्वांचे लक्ष वेधून घेतले, तर भालाफेक प्रकारात कांस्यपदक मिळवत आपल्या अष्टपैलू क्षमतेची साक्ष दिली.
विशेष ऑलिम्पिक्स भारत यांच्या वतीने आयोजित या स्पर्धेत देशभरातून आलेल्या खेळाडूंमध्ये मयुरेशने दाखवलेली शिस्त, संयम आणि लढाऊ वृत्ती ही केवळ पदकांपुरती मर्यादित नव्हती, तर मानवी क्षमतेच्या अमर्याद ताकदीचा ठाम संदेश देणारी ठरली. अडचणींवर मात करत राष्ट्रीय स्तरावर प्रथम क्रमांक मिळवणे ही मयुरेशसाठी वैयक्तिक यशापेक्षा अनेक पटींनी मोठी सामाजिक प्रेरणा ठरली आहे.
या उज्ज्वल यशामागे सातत्यपूर्ण प्रशिक्षण, योग्य मार्गदर्शन आणि संस्थेचे भक्कम पाठबळ महत्त्वाचे ठरले आहे. मयुरेश हा मधुशाला एनएएसईओएच (नॅशनल सोसायटी फॉर इक्वल ॲपॉर्च्युनिटी फॉर दि हॅन्डिकॅप्ड) या संस्थेत प्रशिक्षण घेत असून, तिचे कार्य समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे. कार्यकारी सचिव व महासंचालक योगेंद्र शेट्टी, शिक्षक राजेंद्र जगताप आणि प्रशिक्षक दत्ता चव्हाण यांनी मयुरेशच्या क्षमतेवर विश्वास ठेवत त्याला घडवले. शिस्तबद्ध सराव, आत्मविश्वास वाढवणारे मार्गदर्शन आणि सातत्यपूर्ण मेहनतीमुळे मयुरेश राष्ट्रीय स्तरावर झळकू शकला.
या यशामुळे केवळ मयुरेशच नव्हे, तर अनेक खेळाडूंच्या मनात नवी उमेद निर्माण झाली आहे. योग्य संधी, मार्गदर्शन आणि पाठबळ मिळाल्यास हे खेळाडू देशपातळीवरच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही भारताचा अभिमान वाढवू शकतात, हे या यशाने पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.