* ठाणेवैभव क्रिकेट करंडक स्पर्धा
* प्रशांत खावरे सामनावीर
ठाणे: ब गटात झालेल्या चित्तथरारक सामन्यात गोदरेज स्टाफ क्लबने अवघ्या एक धावेने एल अँड टी स्पोर्ट्स क्लबवर विजय मिळवला. तीन विकेट घेणारा गोदरेजचा प्रशांत खावरे सामनावीर ठरला.
सेंट्रल मैदान येथे सामना सुरू होण्यापूर्वी ‘ठाणेवैभव’कार कै.नरेंद्र बल्लाळ यांच्या ३२व्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर ज्येष्ठ पंच सुधीर संसारे यांना नाणेफेक करण्याचा मान देण्यात आला. यावेळी एल अँड टी स्पोर्ट्स क्लबने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. गोदरेज संघाच्या पुवया गाउंडर याने सर्वाधिक ४४ धावा जमवल्या. यात दोन षटकार आणि चार चौकारांचा समावेश आहे. त्या पाठोपाठ तुषार पाटील आणि वैभव कदम यांनी अनुक्रमे ३८ आणि ३४ धावांचे योगदान दिले. गोदरेजने सर्व बाद २३८ धावांचे आव्हान उभे केले. एल अँड टी कडून सिद्धेश चव्हाण आणि निषाद सावंत यांनी प्रत्येकी तीन बळी घेतले तर यग्येश करकेरा आणि यश कोकरे यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले.
एल अँड टी संघाने गोदरेज संघाला जबरदस्त प्रत्युत्तर देत सामना रंगतदार केला. एल अँड टी संघाच्या महेश पाल याने तीन षटकार आणि चार चौकार ठोकत सर्वाधिक ६१ धावा केल्या. यग्येश करकेरा याने ४७ तर दलरॉन रॉड्रिग्ज याने ३७ धावा केल्या. त्यांची ही लढत मात्र अपयशी ठरली आणि २३७ धावांवरच संपूर्ण एल अँड टी संघ तंबूत परतला.
गोदरेजने हा सामना केवळ एका धावेने जिंकला. संघाकडून प्रशांत खावरे याने तिखट गोलंदाजी करत तीन बळी घेतले. रवी लक्का आणि वैभव कदम यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले. प्रशांत खावरे हा सामनावीर ठरला.