ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियमवर शनिवारी झालेल्या वूमेन्स अंडर 23 एकदिवसीय ट्रॉफी सामन्यात गोव्याचा पराभव करण्यासाठी राजस्थानला फक्त अडीच तास लागले. 42 धावांचा पाठलाग राजस्थानने 15.4 षटकांत केला आणि आठ गडी राखून विजय मिळवला.
राजस्थानसाठी गोलंदाजीची सुरुवात अक्षिता महेश्वरीने केली आणि तिने तिच्या आठ षटकांत केवळ 10 धावा देऊन सहा गडी बाद केले. या उजव्या हाताच्या वेगवान गोलंदाजाने नवीन चेंडूचा उत्तम वापर करून डावाच्या पहिल्या नऊ षटकांत पाच विकेट्स पटकावल्या आणि गोव्याच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले. अक्षिताने या स्पर्धेतील खेळलेल्या पाच सामन्यात 17 बळी घेतले आहेत ज्यात ओडिशाविरुद्ध घेतलेल्या हॅट्ट्रिकचा समावेश आहे.
दुसरीकडे, गोव्याचा दिवस विसरता येण्याजोगा होता. त्यांची यष्टिरक्षक-फलंदाज दिव्या नाईक (17) ही एकमेव फलंदाज होती जिने दोन अंकी धावा केल्या.
या स्पर्धेत सलग पाचव्या विजयासाठी केवळ 42 धावांचे आव्हान असताना राजस्थानची सलामीवीर मेघा सैनी (नाबाद 22) हिने तिच्या संघाला विजय मिळवून दिला.
सामन्यानंतर, अक्षिताला जेव्हा सामन्यात वापरलेला चेंडू मिळाला तेव्हा तिला प्रचंड आनंद झाला. त्या चेंडूवर तिने तिचे गोलंदाजीची आकडेवारी लिहली. ठाणेवैभवशी बोलताना ती म्हणाली, “डोमेस्टिक क्रिकेटमधील ही माझी सर्वोत्तम गोलंदाजी आहे. मी बरेचदा तीन किंवा चार विकेट्स घेतल्या आहेत. पण आज पहिल्यांदाच मी सिक्स-फॉर नोंदवला. वेगवान गोलंदाजीसाठी परिस्थिती उत्तम होती. खेळपट्टीवर असलेले थोडे गवत आणि मंद वाऱ्याची झुळूक मला मदत करत होती. मी माझ्या इनस्विंग गोलंदाजीचा चांगला वापर केला जी माझी ताकद आहे आणि मला त्याचा भरपूर फायदा झाला.”
मूळची जयपूरची असलेल्या अक्षिताने 2017-18 मध्ये तिच्या गल्लीत राहणाऱ्या मुलांसोबत क्रिकेट खेळायला सुरुवात केली. नंतर, ती व्यावसायिक प्रशिक्षणासाठी क्रिकेट अकादमीमध्ये सामील झाली, जिथे तिच्या प्रशिक्षकाने तिला एक चांगला वेगवान गोलंदाज बनवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली. त्याने तिला गोलंदाजीची विविधता, क्रीजचा वापर इत्यादी शिकवले आणि तिला प्रक्रियेचे अनुसरण करण्यास आणि दर्जेदार सरावावर लक्ष केंद्रित करण्यास प्रोत्साहित केले. राजस्थान महिला अंडर 23 साठी खेळण्यापूर्वी, अक्षिताने राज्याच्या अंडर 19 संघाचे प्रतिनिधित्व केले होते आणि NCA आणि ZCA शिबिरांचा देखील भाग होती.