विजय हजारे ट्रॉफी 2023 मध्ये गोव्याने पहिला विजय नोंदवला

शतकवीर स्नेहल कौठणकर आणि सुयश प्रभुदेसाई आणि वेगवान गोलंदाज अर्जुन तेंडुलकरच्या बळावर गोव्याने शुक्रवारी नागालँडवर 232 धावांनी विजय मिळवला.

विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेतील नागालँडविरुद्धच्या लढतीत प्रथम फलंदाजी करताना गोव्याने ठाण्याच्या दादोजी कोंडदेव स्टेडियमवर 50 षटकांत 383 धावा केल्या. कौठणकर (118 चेंडूत 114 धावा) आणि प्रभुदेसाई (81 चेंडूत 132 नाबाद) नागालँडच्या गोलंदाजांवर भारी पडले. अखेरच्या षटकांमधे राहुल त्रिपाठीने 16 चेंडूत 36 धावा करत त्याच्या आक्रमक खेळीची झलक दिली. नागालँडचा चोपिसे होपोंगक्यु हा त्याच्या संघासाठी आठ षटकांत 68 धावा देऊन आणि तीन गडी बाद करून सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला.

कर्णधार रोंगसेन जोनाथनच्या उत्कृष्ट अर्धशतकाच्या जोरावर नागालँडने झुंज दिली. मात्र, 39.1 षटकात 151 धावांवर संपूर्ण संघ बाद झाला आणि सामना 232 धावांनी गमावला. गोव्याचा डावखुरा वेगवान गोलंदाज अर्जुन तेंडुलकरने त्याच्या 10 षटकांत फक्त 30 धावा दिल्या आणि चार विकेट्स पटकावल्या. तेंडुलकरने बाउन्सर आणि लेन्थ चेंडूंचा चांगला वापर केला.

सामना संपल्यानंतर ठाणेवैभवने अर्जुन तेंडुलकर, राहुल त्रिपाठी आणि सुयश प्रभुदेसाई यांच्याशी सामन्याबाबत चर्चा केली.

अर्जुन तेंडुलकर (PC: Juili Ballal/Thanevaibhav)

 

 

 

 

 

 

 

 

तेंडुलकर म्हणाला, “आम्ही स्पर्धा सुरू होण्याच्या एक आठवडा आधी मुंबईत आलो आणि लाल मातीच्या खेळपट्ट्यांवर सराव केला. गोव्यात काळ्या मातीच्या खेळपट्ट्या आहेत, त्यामुळे आमच्यासाठी या परिस्थीची सवय करून घेणे महत्त्वाचे होते. एक नवीन बॉल बॉलर म्हणून नियंत्रण अगदी आवश्यक असते. माझे उद्दिष्ट लवकर विकेट्स घेण्याचे होते जेणेकरून मधल्या षटकांमध्ये जेव्हा फिरकी गोलंदाज येतात तेव्हा त्यांना चांगले प्लॅटफॉर्म मिळेल. गोलंदाजी विभाग म्हणून, आम्ही सातत्यपूर्ण लाईन आणि लेन्थ ठेवायचा निर्धार केला. फलंदाजांना सहज धावा करू न देणे ही आमची योजना होती.”

राहुल त्रिपाठी (PC: Juili Ballal/Thanevaibhav)

 

 

 

 

 

 

 

 

दादोजी कोंडदेव स्टेडियमवर खेळण्याचा अनुभव सांगताना त्रिपाठी म्हणाला, “मला ठाण्यात खेळायला आवडते. मी जेव्हा आयपीएलमध्ये कोलकता नाईट रायडर्सचा भाग होतो तेव्हा हे आमचे सरावाचे मैदान होते. मला असं वाटतं की यामुळे मला फायदा झाला. इथली खेळपट्टी खूपच स्पोर्टिंग आहे कारण त्यात फलंदाज आणि गोलंदाज दोघांसाठी काहीतरी आहे.”

सुयश प्रभुदेसाई (PC: Juili Ballal/Thanevaibhav)

 

 

 

 

 

 

 

 

गोव्याचा आजच्या सामन्यातील अव्वल फलंदाज प्रभुदेसाई त्याच्या फलंदाजीबद्दल म्हणाला, “आमच्या सलामीवीरांनी चांगली सुरुवात केली आणि मोमेंटम कायम राखणे माझ्यासाठी महत्त्वाचे होते. सुरुवातीला हे थोडे आव्हानात्मक होते पण नंतर चेंडू चांगल्या प्रकारे बॅटवर येत होता. मला शेवटपर्यंत फलंदाजी करायची होती आणि संघासाठी चांगली धावसंख्या उभारायची होती. जेव्हा मी मैदानावर होतो तेव्हा मी माझ्या जोडीदाराशी खेळपट्टी विषयी संवाद साधत होतो. मी याआधी आयपीएल सराव सत्रात इथे खेळलो आहे म्हणून मला इथली परिस्थिती माहित आहे.”