- BY HASTKALA LIFE
सध्या वय ९९ असले तरी ९ अधिक ९ वर्षांच्या तरुणांसारखा उत्साह. त्यांची देहबोली, संभाषण अगदी सकारात्मक ऊर्जेने भारलेलं, त्यांचे अगत्य आणि समय सूचकता अजूनही शाबूत आणि हाडाच्या शिक्षिका आहे म्हणूनच या वयातही त्यांचे ज्ञानदानाचे कार्य अविरत चालूच आहे.
न गुरोरधिकं तत्त्वं न गुरोरधिकं तपः।
गुरू पेक्षा श्रेष्ठ तत्त्व नाही, गुरू पेक्षा श्रेष्ठ तप नाही, असे ज्यांच्याबद्दल म्हणता येईल त्या आहेत संस्कृत विषयाच्या गुरुतुल्य शिक्षिका लीला मोरेश्वर श्रोत्री. गेल्या आठ दशकांपासून, वयाच्या १९ वर्षापासून ते आजतागायत त्यांचा ज्ञानदानाचा यज्ञ अखंडपणे सुरूच आहे.
घरात १२ भावंडांपैकी थोरल्या असलेल्या लीला श्रोत्री यांना शिक्षणाची आवड असल्याने हट्ट धरून घरातील धुणं भांडी, सडा सारवण अशी सर्व प्रकारची कामे सांभाळून १९४६ मध्ये पेण प्रायव्हेट हायस्कूलमधून त्यांनी मॅट्रिकपर्यंत शिक्षण पूर्ण केले आणि त्यानंतर पेण हायस्कूलमध्येच तीन वर्षे शिक्षिका म्हणून नोकरीत रुजू झाल्या.
पूर्वाश्रमीच्या लीला ताम्हणे १९४९ मध्ये लग्न झाल्यावर ठाण्यात स्थायिक झाल्या. घरातील जबाबदाऱ्यांमुळे त्यांना पुढील १४ वर्षे नोकरी करता आली नाही, म्हणून त्यांनी घरातच मोफत शिकवणी वर्ग चालू ठेवले. पुढे १९६३ ते १९८५ अशी २२ वर्षे शिवसमर्थ विद्यालयात त्यांनी शिक्षिकेची नोकरी केली आणि उपमुख्याध्यापिका या पदावर असताना निवृत्त झाल्या.
चार मुले, घर, नोकरी हे सर्व सांभाळत असताना जिद्द, चिकाटी आणि शिक्षणाचा ध्यास असलेल्या श्रोत्रीबाईंनी एसएनडीटी कॉलेजमधून बाह्य परीक्षा देऊन १९६९ मध्ये बी.ए. पदवी तसेच १९७१ साली पुणे विद्यापीठातून एम.ए, बी. एड पदवी प्राप्त केली. माध्यमिक विभागात शिकवता यावे यासाठी त्यांनी STC (Senior Teaching Certificate) कोर्स सुद्धा केला. शाळेत असताना हिंदी विषय नसल्याने शिक्षिका म्हणून कार्यरत असताना त्यांनी विद्यार्थ्यांबरोबर हिंदीच्या ४ परीक्षा देत प्राविण्य मिळवले.
त्यानंतर पुढील २८ वर्षे विद्यालयात टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, महाराष्ट्र ज्ञानपीठ, होमिभाभा, शिष्यवृती अशा अनेक बाह्य परीक्षांचे नियोजन तसेच मराठी, हिंदी, संस्कृत, इंग्रजी, व्हर्नाक्युलर फायनान्स या विषयांचे विनामूल्य शिकवणी वर्गही घेतले. हा त्यांचा अध्यापनाचा प्रवास आजही सुरू असून आता त्या एका विद्यार्थिनीचे संस्कृत विषयाचे वर्ग घेतात.
शिक्षक कसा असावा? हे विचारल्यावर त्या त्यांचे शिक्षक लागू गुरुजींची आवर्जून आठवण काढतात. पुस्तक बाजूला ठेऊन शिकवता आले पाहिजे असा त्यांचा नियमच होता. शिकवायचं कसं आणि शिक्षकाने विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तरं कशी द्यायची याची उत्तम तयारी लागू गुरुजींनी करून घेतल्याचे त्या सांगतात. पुढे त्यांच्या या प्रवासात ठाण्यातील शिक्षणतज्ज्ञ स. वि. कुलकर्णी यांनी त्यांचा आत्मविश्वास वाढवण्यात मोलाचे योगदान दिले. संस्कृत हा विषय बी.ए. ला घेतला नसल्याने तो माध्यमिक वर्गाला कसा शिकवावा हा गोंधळ मनात असताना, कुलकर्णी सरांनी मुळातच व्याकरणाचा पाया पक्का असलेल्या लीला बाईंचा अभ्यास सुट्टीमध्ये अधिक पक्का करून घेतला.
आजकाल खूप क्लासेसमुळे विद्यार्थ्यांची धावपळ होते आणि ताण येतो, तेव्हा जे क्लासेसमध्ये शिकवता तेच शाळेत का शिकवले जात नाही?, असा खडा सवाल श्रोत्री बाई सर्व शिक्षकांना विचारतात. मुलांना शिकवताना त्यांना आपुलकी आणि मातृतुल्य प्रेमाने शिकवावे म्हणजे त्यांना अभ्यासाची आवड निर्माण होईल असे त्या सांगतात. हल्ली पैकीच्या पैकी मार्क्स मिळतात पण तसे न होता भाषेमध्ये व्याकरण आणि शुद्धलेखन हे नीट तपासले गेले पाहिजे असे त्या आवर्जून सांगतात.
श्रोत्रीबाईंनी शिवणकामाचा डिप्लोमा केला असून त्या मुलांचे ११ वी पर्यंतचे शाळेचे युनिफॉर्म घरीच शिवायच्या. हाडाच्या शिक्षिका असलेल्या श्रोत्रीबाई या पाककलेमध्ये सुद्धा निपुण आहे. त्यांच्या हातच्या पुरणपोळ्या म्हणजे पर्वणीच. त्यांनी केलेल्या लाडवांची आठवण काढणार नाही असा एकही विद्यार्थी नाही. त्यांच्या हाताखाली तयार झालेले असंख्य विद्यार्थी आज विविध क्षेत्रात उच्च पदावर कार्यरत आहेत. या विद्यार्थ्यांनी त्यांच्या बाईंचा नव्वदीचा कार्यक्रम गडकरी रंगायतन येथे मोठ्या उत्साहाने साजरा केला आणि आता ते बाईंच्या शतकमहोत्सवी वाढदिवसाची आतुरतेने वाट पाहत आहेत.
मुलं, मुली, नातवंड, पतवंड या सगळ्यांबद्दल बाई कौतुकाने आणि भरभरून बोलतात. त्यांना कोणती औषधे चालू आहेत का, असे विचारल्यावर मुळातच उत्तम शरीरस्वास्थ्य लाभलेल्या श्रोत्रीबाईंनी त्यांचा औषधाचा डब्बा उघडून बीपीसाठी Telmisartan hydrochlorothiazide tablet चालू असल्याचे वाचून दाखवताच त्यांची या वयात असलेली सजगता आणि भाषा प्रभुत्वावर अवाक व्हायला झाले. त्यांचा थोरला मुलगा गेल्यानंतरच त्यांना हे औषध चालू झाले. त्यांच्या थोरल्या मुलाला अजित यांना वयाच्या ७५व्या वर्षी देवाज्ञा झाली आणि त्यामुळे त्या देवावर रुसल्याचे सांगताना या दुःखद घटनेचे शल्य त्यांच्या बोलण्यात जाणवत राहते.
“अध्यापन हा माझा श्वास आहे, पुनर्जन्म मिळाला तर अध्यापनाचे काम करीन आणि गरीब मुलांना मोफत शिकवीन”, असे म्हणणाऱ्या श्रोत्रीबाई पुढील पिढीला स्वाभिमानाने जगा आणि चांगल्या मार्गाने पैसे कमवा असा सल्ला देतात.
श्रोत्रीबाईंना रोटरी क्लब ठाणेतर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार (२०१०), ठाणे महानगरपालिकेतर्फे ठाणे गौरव पुरस्कार (२०१८), व्यास क्रिएशन्सतर्फे सेवारत्न विशेष पुरस्कार (२०१९) अशा अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
वयाच्या ७५व्या वर्षानंतर श्रोत्रीबाईंनी गीता, दासबोध, ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा या परीक्षा देऊन त्यात प्राविण्य मिळवले आहे. त्यांच्यात असलेला जिवंतपणा, सकारात्मकता, विद्यार्थ्यांसाठी असलेली तळमळ आणि प्रेम आजही त्यांच्यातील सच्च्या शिक्षकाची ग्वाही देते. हस्तकला टीमने श्रोत्री बाईंशी संवाद साधल्यावर त्यांच्याकडून निघताना त्यांनी शिक्षकाच्या सवयीप्रमाणे हातावर ठेवलेले मेलडी चॉकलेट्स आणि भरभरून दिलेला आशीर्वाद, आयुष्यभर आठवणीत राहण्यासारखा आहे. ही मुलाखत म्हणजे श्रोत्रीबाईंनी आयुष्याचा शाळेचा अभ्यास शिकवल्यासारखी खूप काही देऊन जाते.
– रोहिणी कुलकर्णी