आज वडोदरा येथील कोटांबी स्टेडियमवर वूमन्स प्रीमियर लीग (WPL) 2026 मधील असे दोन संघ आमने-सामने येणार आहेत, ज्यांची या स्पर्धेतील आतापर्यंतची वाटचाल विरोधाभासी ठरली आहे. ऍश्ले गार्डनरच्या नेतृत्वाखालील गुजरात जायंट्स आणि मेग लॅनिंगच्या कप्तानीखालील यूपी वॉरियर्स हे संघ पुन्हा एकदा आमने-सामने येणार असून, याआधी त्यांनी 10 जानेवारी रोजी एकमेकांविरुद्ध सामना खेळला होता. प्लेऑफची शर्यत अधिक चुरशीची होत असताना, पाच पैकी चार संघ समान चार गुणांवर असल्यामुळे या सामन्याचे महत्त्व अधिकच वाढले आहे. WPL 2024 चे विजेते रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू हा एकमेव संघ आधीच पात्र ठरला असून, उर्वरित प्रत्येक सामना निर्णायक ठरणार आहे. अनुभवी ऑस्ट्रेलियन खेळाडूंच्या नेतृत्वाखालील हे दोन्ही संघ या सामन्याचे महत्त्व निश्चितच जाणून आहेत.
या दोन्ही संघांमधील मागील सामना नवी मुंबईतील डॉ. डी. वाय. पाटील स्पोर्ट्स अकॅडेमीत झाला होता, जिथे प्रेक्षकांना धावांचा पाऊस पाहायला मिळाला. 208 धावांचा कठीण पाठलाग करताना यूपी वॉरियर्स 74 ला 4 होते. अशा अडचणीत सापडले असताना पराभव अटळ वाटत होता. मात्र, या पिढीतील सर्वोत्तम प्रतिभांपैकी एक मानल्या जाणाऱ्या फिबी लिचफिल्डने अवघ्या 40 चेंडूत 78 धावांची झंझावाती खेळी करत संघाला सावरण्याचा प्रयत्न केला. तिच्या या शौर्यपूर्ण प्रयत्नानंतरही वॉरियर्स 10 धावांनी पराभूत झाले.
त्या सामन्यानंतर दोन्ही संघांची कामगिरी चढउतारांची राहिली आहे. गुजरात जायंट्सने स्पर्धेची सुरुवात सलग दोन विजयांनी केली होती, मात्र त्यानंतर सलग तीन पराभवांनी त्यांची गती मंदावली आहे. याउलट, यूपी वॉरियर्सने सुरुवातीचे तीन सामने गमावले, पण त्यानंतर दोन वेळा विजेतेपद मिळवलेल्या आणि गतविजेत्या मुंबई इंडियन्सवर सलग दोन विजय मिळवत त्यांनी आपला आत्मविश्वास पुन्हा मिळवला आहे.
या सामन्यात दोन्ही संघांच्या परदेशी खेळाडूंवर विशेष लक्ष असणार आहे.
गुजरात जायंट्ससाठी बेथ मूनी आणि सोफी डिव्हाइन या आक्रमक सलामीवीरांनी मागील तीन सामन्यांत अपेक्षित कामगिरी केलेली नाही, आणि हे तिन्ही सामने संघाने गमावले. तुलनेने अनुभवहीन मधल्या फळीमुळे, अनुभवी सलामीवीरांकडून भक्कम सुरुवात मिळणे संघासाठी अत्यावश्यक ठरणार आहे. तसेच, कर्णधार गार्डनर आणि अष्टपैलू जॉर्जिया वेअरहॅम यांना फलंदाजीसाठी कुठल्या क्रमांकावर उतरवायचे, हा निर्णयही महत्त्वाचा ठरणार आहे. टी-20 क्रिकेटमध्ये सर्वोत्तम फलंदाजांनी जास्तीत जास्त चेंडू खेळणे अपेक्षित असते. त्यामुळे गार्डनर तिसऱ्या आणि वेअरहॅम चौथ्या क्रमांकावर उतरल्यास ते योग्य ठरेल, मात्र त्यामुळे मधली फळी काहीशी कमकुवत भासू शकते. अनुष्का शर्मा आणि भारती फुलमली यांसारख्या अनकॅप्ड भारतीय खेळाडूंनी चमक दाखवली असली, तरी जायंट्सना आपल्या परदेशी खेळाडूंकडून मोठ्या कामगिरीची अपेक्षा असेल.
त्याचप्रमाणे यूपी वॉरियर्ससाठीही कर्णधार लॅनिंग आणि लिचफिल्ड यांच्यावर फलंदाजीची मुख्य जबाबदारी असेल. सलामीवीर किरण नवगिरे अद्याप फॉर्म शोधत असल्याने, वरच्या फळीत लॅनिंगवरील दबाव अधिक वाढतो. चौथा परदेशी खेळाडू निवडताना संघ व्यवस्थापनाला पुन्हा एकदा विचारपूर्वक निर्णय घ्यावा लागणार आहे. लॅनिंग आणि लिचफिल्डसह डावखुरी फिरकीपटू सोफी एक्लस्टनचा संघात समावेश निश्चित मानला जात असून, डिआंड्रा डॉटिन आणि क्लोई ट्रायन यांच्यातील निवड सामन्याच्या निकालावर प्रभाव टाकू शकते.
जरी परदेशी खेळाडू स्पर्धेला झळाळी देत असले, तरी सामने जिंकून देण्याचे खरे काम अनेकदा भारतीय खेळाडूच करतात. गुजरात जायंट्सकडून रेणुका सिंग ठाकूर आणि यूपी वॉरियर्सकडून दीप्ती शर्मा यांसारख्या अनुभवी भारतीय आंतरराष्ट्रीय खेळाडूंच्या उपस्थितीमुळे हा सामना रंगतदार ठरण्याची शक्यता आहे.
प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी महत्त्वाचे दोन गुण पणाला लागले असून, त्यामुळे गुजरात जायंट्स आणि यूपी वॉरियर्ज या दोन्ही संघांसाठी हा सामना ‘करो किंवा मरो’ असा असणार आहे. यूपी वॉरियर्ज विजयाची हॅट्ट्रिक पूर्ण करणार का, की गुजरात जायंट्स पुन्हा एकदा विजयाच्या मार्गावर स्वार होणार?
आमने-सामने (मागील 5 सामने)
गुजरात जायंट्स – 4 | यूपी वॉरियर्स – 1
सामन्याची थोडक्यात माहिती
दिनांक: 22 जानेवारी 2026
वेळ: संध्याकाळी 7:30 वाजता
स्थळ: कोटांबी स्टेडियम, वडोदरा
थेट प्रक्षेपण: स्टार स्पोर्ट्स नेटवर्क, जिओहॉटस्टार