शुक्रवारी वडोदऱ्यातील कोटांबी स्टेडियमवर झगमगणाऱ्या फ्लडलाइट्सखाली वूमन्स प्रीमियर लीग (WPL) 2026 चा एक अत्यंत महत्वाचा सामना रंगणार आहे. गुजरात जायंट्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील हा सामना जणू ‘करो किंवा मरो’ असा असून, प्ले-ऑफचे तिकीट पणाला लागले आहे.
सात सामन्यांत चार विजयांसह आठ गुण मिळवत गुजरात सध्या गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. त्याच वेळी, सातपैकी तीन सामने जिंकलेल्या मुंबई इंडियन्सकडे सहा गुण असून ते तिसऱ्या क्रमांकावर आहेत. गुजरातसाठी गणित स्पष्ट आहे—हा सामना जिंकला, तर प्ले-ऑफचे स्थान निश्चित. मात्र पराभव पत्करावा लागल्यास त्यांची अडचण वाढू शकते. मुंबईने विजय मिळवून गुणसंख्या आठवर नेल्यास, चांगल्या नेट रन रेटच्या जोरावर ते गुजरातच्या पुढे झेप घेऊ शकतात.
या साऱ्या समीकरणात दिल्ली कॅपिटल्सनेही रंगत वाढवली आहे. दिल्लीकडेही सहा गुण असून, गुजरातपेक्षा त्यांचा नेट रन रेट अधिक चांगला आहे. रविवारी त्यांचा अखेरचा साखळी सामना यूपी वॉरियर्सविरुद्ध होणार असल्याने पात्रतेची लढत अजून खुली आहे. त्यामुळे नेट रन रेटच्या गुंतागुंतीत अडकण्याऐवजी मुंबईवर विजय मिळवून थेट प्ले-ऑफमध्ये प्रवेश करणे, हाच गुजरातसाठी सर्वात सोपा मार्ग आहे. दुसरीकडे, शुक्रवारी विजय मिळवला तर दिल्ली–यूपी सामन्याचा निकाल काहीही असो, मुंबई इंडियन्स प्ले-ऑफमध्ये पोहोचणार आहेत.
आत्मविश्वासाच्या जोरावर मैदानात उतरणाऱ्या मुंबई इंडियन्सने गुजरातविरुद्ध मागील पाचही लढती जिंकल्या आहेत आणि हा विजयक्रम सहाव्या सामन्यापर्यंत नेण्याचा त्यांचा मानस असेल. 13 जानेवारीला डॉ. डी. वाय. पाटील स्पोर्ट्स अकॅडमीवर झालेल्या मागील भेटीत प्रेक्षकांना धावांचा पाऊस पाहायला मिळाला होता. जवळपास 400 धावा झालेल्या त्या सामन्यात मुंबईने 193 धावांचे आव्हान सात विकेट्स राखून आणि चार चेंडू शिल्लक ठेवून पार केले. कर्णधार हरमनप्रीत कौरने 43 चेंडूंत नाबाद 71 धावांची झंझावाती खेळी करत विजयाची धुरा वाहिली होती. यावेळीही मुंबईची भिस्त तिच्यावरच असेल.
हरमनप्रीतसोबतच इंग्लंडची कर्णधार नॅटली सिव्हर-ब्रंटही जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूविरुद्ध तिने WPL मधील पहिले शतक झळकावले असून, त्याच लयीत पुढे खेळण्याची तिची तयारी असेल. अमिलिया कर, हेली मॅथ्यूज आणि शबनिम इस्माईल यांचे योगदानही दोन वेळच्या विजेत्यांसाठी निर्णायक ठरणार आहे.
दरम्यान, गुजरात जायंट्सना त्यांच्या अलीकडील कामगिरीतून मोठा आत्मविश्वास मिळाला आहे. सलग दोन विजयांसह ते या सामन्यात उतरतील, आणि या दोन्ही विजयांचे श्रेय त्यांच्या प्रभावी गोलंदाजांना जाते. सोफी डिवाइन आणि राजेश्वरी गायकवाड यांनी विशेष चमक दाखवली असून, डिवाइनने फलंदाजीतही महत्त्वाची भूमिका बजावली आहे. यंदा अनेकदा अपेक्षेपेक्षा सरस खेळ करणाऱ्या गुजरातसाठी, कर्णधार ऍश्ले गार्डनरकडून या हंगामातील सर्वात महत्त्वाच्या सामन्यात निर्णायक खेळीची अपेक्षा असेल.
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आधीच प्ले-ऑफमध्ये पोहोचले असल्याने, शुक्रवारचा हा सामना दुसऱ्या पात्र संघाचे चित्र स्पष्ट करू शकतो. WPL 2026 मधील त्यांचा प्रवास सुरु ठेवण्यासाठी गुजरात जायंट्स आणि मुंबई इंडियन्स सर्वस्व पणाला लावतील, यात शंका नाही.
आमने-सामने (मागील 5 सामने)
गुजरात जायंट्स – 0 | मुंबई इंडियन्स – 5
सामन्याची थोडक्यात माहिती
दिनांक: 30 जानेवारी 2026
वेळ: संध्याकाळी 7:30 वाजता
स्थळ: कोटांबी स्टेडियम, वडोदरा
थेट प्रक्षेपण: स्टार स्पोर्ट्स नेटवर्क, जिओहॉटस्टार