* मुंबई महापालिकेने मागवल्या निविदा
* बांधकामाचा अंदाजित खर्च तीन हजार कोटींवर!
मुंबई : गेल्या तब्बल दोन दशकांहून केवळ चर्चा सुरू असलेल्या गारगाई धरणासाठी मुंबई महापालिकेने मंगळवारी निविदा मागवल्या. मुंबईच्या वाढत्या लोकसंख्येसाठी पाण्याची मागणी पूर्ण करण्याकरिता वाडा तालुक्यातील ओगदे गावाजवळ गारगाई धरण बांधण्यासाठी प्रशासनाने निविदा मागवल्या आहेत. या धरणाच्या बांधकामासाठी सुमारे तीन हजार कोटी रुपये खर्च अंदाजित आहे.
भविष्यात मुंबईकरांची पाण्याची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी पाण्याचा पर्यायी स्रोत मुंबई महापालिकेला उभा करावा लागणार आहे. त्यामुळे पालिकेने गारगाई धरण प्रकल्प पूर्ण करण्याचे ठरवले आहे. गारगाई धरण प्रकल्पामुळे तानसा अभयारण्य बाधित होणार असून त्याकरिता वन्यजीव विभागाची परवानगी घ्यावी लागणार आहे. तसेच वन विभागाचीही परवानगी लागणार आहे. या परवानग्यासाठी मुंबई महापालिकेने २०२० मध्ये अर्ज सादर केले होते. मात्र अद्याप परवानगी न मिळाल्यामुळे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी एप्रिल महिन्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा बैठक घेतली होती. त्यानंतर या प्रकल्पाला गती मिळाली.
वन्य जीव मंडळाची व केंद्र सरकारच्या वन विभागाची परवानगी मिळायची आहे. मात्र राज्याची परवानगी मिळाली आहे. परवानगी मिळवण्याची प्रक्रिया एका बाजूला सुरू राहील व एका बाजूला निविदा प्रक्रियाही सुरू राहील, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिली.
मुंबई महापालिकेने १९९४ मध्ये मुंबईच्या पाणीपुरवठ्याबाबत अभ्यास करून कृती आराखडा सादर करण्यासाठी डॉक्टर माधवराव चितळे यांची समिती स्थापन केली होती. या समितीने गारगाई आणि पिंजाळ व मध्यवैतरणा या तीन धरणांचा कृती आराखडा मुंबई महापालिकेला तयार करून दिला. राज्य सरकारने २०१३ मध्ये गारगाई धरण प्रकल्प मुंबईसाठी असल्याचे जाहीर केले होते. मात्र इतकी वर्षे हा प्रकल्प रखडला होता. मुंबई महापालिकेने २०१४ मध्ये या प्रकल्पाचा ढोबळ खर्च ३०१५ कोटी निश्चित केला होता. वन विभागाला द्यावा लागणार मोबदला, बाधितांचे पुनर्वसन, बाधितांना नुकसान भरपाई, धरणाचे बांधकाम, जलबोगद्याचे जाळे हे धरून ही ढोबळ किंमत ठरवण्यात आली होती. मात्र अनेक वर्षे हा प्रकल्प रखडल्यामुळे खर्च वाढला असून आता केवळ बांधकामासाठी तीन हजार कोटी रुपये खर्च अंदाजित करण्यात आला आहे. हा खर्च आणखी वाढण्याची शक्यता आहे.