बोगस मतदान व प्रचारासाठी मनुष्यबळ पुरवणारी भिवंडीत टोळी

भिवंडी: निवडणुकीच्या निमित्ताने निघणाऱ्या प्रचार रॅली, सभा व मतदानासाठी बोगस मतदार उपलब्ध करून देणारी टोळी भिवंडीत सक्रिय झाली असून पोलिस आणि महापालिका आयुक्त तथा निवडणूक अधिकारी अनमोल सागर यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.

भिवंडी महापालिकेची येत्या १५ जानेवारीला निवडणूक होणार आहे. तर उद्या मंगळवार २३ ते ३० डिसेंबर दरम्यान उमेदवारी अर्ज भरण्यासाठी सुरुवात होणार आहे. त्यासाठी शिवसेना, भाजप, काँग्रेस, समाजवादी, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासह विविध राजकीय पक्ष व अपक्ष उमेदवारांनी तयारी सुरु केली आहे. उमेदवारी अर्ज भरणे, प्रचार रॅली, सभा अशा विविध कामांसाठी मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ लागत असल्याने काही राजकीय पक्ष व अपक्ष उमेदवार हे या कामकाजासाठी भाडेतत्वावर अथवा रोजंदारीवर बेरोजगार युवकांसह महिला व पुरुष वर्ग शोधत आहेत. त्यामुळे अशा उमेदवारांना महिलांसह पुरुषवर्ग पुरविण्यासाठी शहरात गेल्या काही दिवसांपासून दलालांच्या टोळ्या सक्रिय झाल्या आहेत. हे दलाल बोगस मतदानासाठी देखील एक हजार ते पाच हजार रुपयांपर्यंत बोगस मतदार उपलब्ध करून देत असल्याची चर्चा सुरु झाली आहे.

शहरातील झोपडपट्टी भागातील महिला-पुरुष पैशाच्या आमिषाने अशी कामे करण्यासाठी पुढे येत असल्याने त्यांचा गैरफायदा घेतला जात आहे. प्रचारादरम्यान या लोकांना आपण कोणत्या पक्षाचा अथवा उमेदवाराचा प्रचार करीत आहे, हे देखील सांगता येत नाही. तसेच अशा काही महिलांची व पुरुषांचे बोगस मतदानासाठी बनावट आधार कार्ड, ओळखपत्रे तयार केली जात असून मागील महानगरपालिका निवडणुकीत भोईवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत कचऱ्यात बोगस मतदारांची ओळखपत्रे मिळाली होती. त्यामुळे पोलीस विभागासह निवडणूक विभागाला देखील सतर्क राहणे क्रमप्राप्त बनले आहे.

नुकतेच अंबरनाथ येथे निवडणुकीत मतदान करण्यासाठी भिवंडीतून १५०-२०० बोगस मतदारांना काही दलालांनी पुरविल्याचे पोलिसांनी उघडकीस आणले आहे. याबाबत गुन्हा दाखल झाला आहे. हे बोगस मतदार भिवंडी शहरातील शांतीनगर भागातील रहिवासी असल्याचे पोलिसांनी सांगितले. याबाबत सखोल चौकशी सुरु झाली आहे. भिवंडीत निवडणुकीचे वारे वाहू लागल्याने बोगस मतदारांना मतदानासाठी तसेच प्रचार रॅली व इतर कामासाठी इच्छुक उमेदवारांना पुरविण्यासाठी शहरातील दलाल वर्ग सक्रिय झाला असून या टोळ्या शहरातील विविध भागात सक्रिय झाल्या आहेत. भिवंडीत निवडणूक निमित्ताने होणारे बोगस मतदान रोखण्यासाठी निवडणूक आयुक्त अनमोल सागर व पोलीस उपायुक्त शशीकांत बोराटे यांनी या सक्रीय टोळ्यांचा बंदोबस्त करावा. प्रचार रॅलीत सहभागी होणाऱ्या पुरूष-महिलांची नावे व पत्ते यांची नोंद घ्यावी. त्यामुळे निवडणुकीतील गैरप्रकारांना आळा बसेल. तसेच परिसरात अशांतता निर्माण होणार नाही. इतर वार्ड अथवा प्रभागातील नागरिकांच्या सहभागास अटकाव करून त्यांची व्हिडिओ शुटिंग करावी आणि निवडणूक नियमानुसार उमेदवारावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी शहरातील सामाजिक संस्था आणि दक्ष नागरिकांकडून केली जात आहे.