बाप्पाच्या सजावटीत साकारले गडकरी रंगायतन

स्वरदा जोशी-बडवे/ ठाणे

शहराचा मानबिंदू म्हणून ख्याती असलेले राम गणेश गडकरी रंगायतन हे नाट्यगृह म्हणजे समस्त ठाणेकरांच्या जिव्हाळ्याचा विषय. या गडकरी रंगायतन नाट्यगृहाच्या वास्तूच्या स्मृती जपण्यासाठी, त्याच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी ठाणे शहरातील क्षितिज दाते यांनी आपल्या घरी दीड दिवसाच्या बाप्पाच्या आरासासाठी साक्षात गडकरी रंगायतनच्या जुन्या वास्तूची प्रतिकृती साकारली. त्यामुळे दाते यांच्या घरी बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी गेलेल्यांनी गडकरी रंगायतनच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.

तब्बल दहा महिने नूतनीकरणाच्या कामासाठी बंद असलेल्या गडकरी रंगायतन नाट्यगृहाचा पडदा मोठ्या प्रतीक्षेनंतर स्वातंत्र्यदिनी पुन्हा उघडला. या कामाच्या दरम्यान या नाट्यगृहाचा चेहरामोहरा बदलला. नाट्यगृहाच्या झालेल्या नूतनीकरणाबाबत पसंती मिळाली आहे. मात्र असे असले तरी आजही ठाणेकरांना या नाट्यगृहाची जुनी वास्तू जशीच्या तशी डोळ्यासमोर आहे. त्यामुळे नूतनीकरण झालेल्या नाट्यगृहाचे स्वागत करताना गडकरी रंगायतनच्या जुन्या आठवणींना पुन्हा उजाळा देण्यासाठी श्री.दाते यांनी अतिशय कल्पकतेने ही प्रतिकृती साकारली आहे.

त्यांनी कार्डबोर्डचा वापर करून १५ दिवसांच्या अथक मेहनतीतून ही पर्यावरणपूरक प्रतिकृती साकारली असून त्यात ठाणेकरांच्या आजही स्मरणात असलेल्या जुन्या नाट्यगृहाच्या तिकीट खिडक्या, नाटकाचे फलक, हाऊस फुल्ल बोर्ड, सिक्युरिटी केबिन, नाट्यगृहाचे कार्यालय दाखवले आहे. इतकेच नव्हे तर या नाट्यगृहाची खरी ओळख असलेल्या दर्शनी भागातील पुतळ्यांच्या शिल्पाचा देखील या सजावटीत समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे दाते यांनी केलेली आरास भक्तांसाठी आकर्षक ठरली आहे.

समस्त ठाणेकरांचा जिव्हाळ्याचा विषय आणि सांस्कृतिक जीवनाचा अविभाज्य घटक म्हणजे “राम गणेश गडकरी रंगायतन”. नूतनीकरण झालेल्या गडकरी रंगायतनचं नुकतंच लोकार्पण झाल्यामुळे पुन्हा नाटकाची तिसरी घंटा वाजेल आणि सर्वांच्याच मनात नवीन आठवणींची साठवण होऊ लागेल. पण तरीही गेली ४८ वर्ष ठाण्याचा सांस्कृतिक वारसा पुढे नेणारी ही जुनी वास्तू सर्व ठाणेकरांच्या नेहमीच स्मरणात राहील. त्याच जुन्या वास्तुविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी यावर्षी गणपती बाप्पांसाठी हे “आठवणीतले गडकरी रंगायतन” आरास म्हणून साकारले असल्याचे क्षितिज दाते यांनी सांगितले. हे काम करताना कुटुंबाची देखील मोलाची मदत झाल्याचे दाते म्हणाले.