जि.प.अधिका-याला ५० हजारांची लाच घेताना अटक

ठाणे : ठाणे जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभागाचे जलसंधारण अधिकारी राजेंद्र पाटील ( 57) यांना ५० हजार रुपयांची लाच घेताना ठाणे लाचलुचपत अधिका-यांनी शुक्रवारी, २४ मार्च २३ रोजी अटक केली.

तक्रारदार यांच्या गावच्या ग्रामपंचायतीसाठी कोल्हापूर पद्धतीचा बंधारा बांधण्याच्या कामी निधी मंजुर झाला होता. त्यानंतर बंधा-याचे बांधकाम सुरु करण्याबाबतची कार्यादेश देण्याकरीता मंजुर निधीच्या एक टक्के म्हणजे, ५० हजार रुपयांची लाच पाटील याने मागितली.

तक्रारदारांनी लघु पाटबंधारे अधिकारी यांची समक्ष भेट घेतली असता, त्यांनी तक्रारदाराकडे 50 हजार रुपयांची मागणी केल्याचे पडताळणीत निष्पन्न झाले. या अनुषंगाने लागलीच 24 मार्च 23 रोजी पाटबंधारे जिल्हा परिषद ठाणे येथे सापळा लावला. लाचेची रक्कम स्वीकारली असता लोकसेवकाला ‘रंगेहाथ’ पकडण्यात आले आहे.

अ‍ॅेंटी करप्शन ब्युरो ठाणे क्षेत्राचे अधीक्षक सुनील लोखंडे आणि अतिरिक्त अधीक्षक अनिल घेरडीकर यांनी मार्गदर्शन केले. भ्रष्टाचारासंबंधी काही माहिती असल्यास किंवा लाचेसंबंधी तक्रार असल्यास एसीबी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.