सुर्या धरणात पोटभर पाणी; वसई-विरारला चिंता नाही

चार महिने पुरेल इतका जलसाठा

ठाणे : ठाणे, मुंबईसह जिल्ह्यातील शहरी महापालिकांच्या हद्दीत पाणी कपातीमुळे नागरिकांची पाण्यासाठी पायपीट सुरू असताना वसई विरारला पाणी पुरवठा करणाऱ्या सुर्या प्रकल्पात मात्र चार महिने पुरेल एवढा पाणीसाठा शिल्लक आहे, त्यामुळे वसई विरारकरांची पाण्याची चिंता मिटली आहे.

वसई-विरार शहराला सुर्या (धामणी), उसगाव आणि पेल्हार अशा धरणांतून सद्यस्थितीत ४०० दशलक्ष लीटर इतका पाणीपुरवठा होत आहे. सर्वाधिक पाणी हे सुर्या योजनेच्या विविध प्रकल्पातून उपलब्ध होत आहे. त्यातील जलसाठा सद्यस्थितीत १५ जुलैनंतरही जवळपास ८२ दिवस पुरवठा होऊ शकतो इतका आहे. तर अन्य दोन धरणात १५ जुलैनंतर २६ दिवस पुरेल एवढे पाणी शिल्लक असल्याची माहिती देण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार ​धामणी धरणात एकूण २७६ दशलक्ष घनमीटर साठ्यापैकी सध्या ८०.१८५ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा उपलब्ध आहे. हा साठा १५ जुलैनंतरही पुढील ८२ दिवस पुरेल इतका आहे. ​उसगाव धरणात ४.९६ दशलक्ष घनमीटर क्षमतेपैकी सध्या २.०४ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा शिल्लक असून १५ जुलैनंतर २६ दिवस पुरेल. तर​पेल्हार धरणात ३.५६ दशलक्ष घनमीटर क्षमतेपैकी सध्या ०८५८ दशलक्ष घनमीटर इतका पाणीसाठा उपलब्ध असून १५ जुलैनंतर २७ दिवस पुरेल एवढा आहे.

मागील वर्षी पालघर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला होता. या पावसामुळे पाणी पुरवठा करणारी ही धरणे तुडूंब भरली होती. याशिवाय नोव्हेंबरपर्यँत अधूनमधून झालेल्या पावसामुळे धरणातील पाण्याची पातळी टिकून राहिली आहे. तसेच मीरा भाईंदरकडे जाणाऱ्या जलवाहिन्या अजूनही कार्यान्वित न झाल्याने पाण्याची होणारी अपेक्षित उचलही थांबली आहे. त्यामुळेही या धरणांतील पाणी साठा मुबलक प्रमाणात शिल्लक आहे.