खुनाचा प्रयत्न प्रकरणातील फरार आरोपी अटकेत

ठाणे. कळवा पोलीस ठाणे अंतर्गत खुनाचा प्रयत्न करणाऱ्या फरार आरोपीस ठाणे गुन्हे शाखेच्या मध्यवर्ती गुन्हे शोध कक्षाने अटक केली आहे.

सदर गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी पोलिसांना गुंगारा देत विविध ठिकाणी लपून राहत होता. ६ जानेवारी रोजी गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे तसेच तांत्रिक विश्लेषण करून गुन्हे शाखेच्या पथकाने सेंट्रल मैदान समोर, टी.एम.टी. बस स्टॉप, ठाणे येथून सापळा रचून आरोपी अजय धोत्रे (२५) रा. वर्तकनगर, ठाणे यास अटक केली.

अटक केल्यानंतर आरोपीची वैद्यकीय तपासणी करून पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी त्यास कळवा पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले आहे. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयकुमार देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

या यशस्वी कारवाईत पोलीस उपनिरीक्षक सुरेश माळोदे, पोलीस हवालदार धनराज घोडके, धनंजय ठोमरे, योगेश क्षीरसागर, अशोक ढवळे, रविदास जाधव, विकास चेमटे व महिला पोलीस सोनाली पाटील यांनी सहभाग घेतला.