म्हातारा-तरणा, सासू-सुनांचा पाऊस
ठाणे : मागच्या सोमवारी ८ जून रोजी सूर्याने मृग नक्षत्रात प्रवेश केला. कोकणात पावसाला प्रारंभ झाला. यावर्षी पंचांगातील पर्जन्य अंदाजाप्रमाणे सरासरी एवढा पाऊस पडेल असे पंचांगकर्ते, खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी सांगितले. शेतक-यांना पर्जन्य नक्षत्रे आणि त्यांची वाहने याची माहिती हवी असते. पंचांगातील पर्जन्य अंदाज हे प्राचीन नियमांप्रमाणे दिलेले असतात, शेतक-यांनी शेतीचे वेळापत्रक हे वेधशाळेने आधुनिक साधनांनी वर्तविलेल्या अंदाजानुसार ठरवावे असेही श्री. सोमण यांनी स्पष्ट केले.
सोमवार ८ जूनपासून मृग नक्षत्र सुरू झाले असून पावसाचे वाहन बेडूक असेल. आर्द्रा नक्षत्र 22 जूनपासून सुरू होणार असून वाहन गाढव असेल. पुनर्वसू नक्षत्र ६ जुलै वाहन घोडा, पुष्य नक्षत्र २० जुलै वाहन उंदीर, आश्लेषा नक्षत्र ३ ऑगस्ट वाहन हत्ती, मघा नक्षत्र १७ ऑगस्ट वाहन मोर, पूर्वा फाल्गुनी नक्षत्र ३० ऑगस्ट वाहन गाढव, उत्तरा फाल्गुनी नक्षत्र १३ सप्टेंबर वाहन बेडूक, हस्त नक्षत्र २७ सप्टेंबर वाहन उंदीर, चित्रा नक्षत्र १० ऑक्टोबर वाहन घोडा आणि स्वाती नक्षत्र शनिवार २४ ऑक्टोबरपासून सुरू होणार असून वाहन बेडूक असेल.
घोडा वाहन असता डोंगर-पर्वत प्रदेशात पाऊस पडेल. कोल्हा, मेंढा, मोर, गाढव व उंदीर वाहन असता पाऊस कमी पडेल. बेडूक, म्हैस व हत्ती वाहन असता खूप पाऊस पडेल असे सांगण्यात आले आहे. अनुभवावरून शेतक-यांनी पावसालाही गमतीशीर नावे ठेवली असल्याचे दा.कृ.सोमण यांनी सांगितले. पुनर्वसू नक्षत्रात जोरदार पाऊस पडतो म्हणून या पावसाला ‘तरणा पाऊस’ म्हणतात. पुष्य नक्षत्रात मंद गतीने पाऊस पडतो म्हणून पुष्य नक्षत्रात पडणा-या पावसाला ‘म्हातारा पाऊस’ म्हणतात. आश्लेषा नक्षत्रात पडणा-या पावसाला ‘आसळकाचा पाऊस’ म्हणतात. मघा नक्षत्रात जोरदार पाऊस पडतो म्हणून या नक्षत्रात पडणा-या पावसाला ‘सासूचा पाऊस’ म्हणतात. पूर्वा फाल्गुनी नक्षत्रात पडणा-या पावसाला ‘सूनांचा पाऊस’ म्हणतात. हस्त नक्षत्रात पडणा-या पावसाला ‘हत्तीचा पाऊस’ म्हणतात. चित्रा नक्षत्रात पावसाचा लपंडाव चालू असतो म्हणून या नक्षत्रात पडणा-या पावसाला ‘आंधळीचा पाऊस’ म्हणतात, अशी माहिती श्री.सोमण यांनी दिली.