* ठाण्यात किरीट सोमैय्या यांचा खळबळजनक आरोप
* चौकशी करण्याचे आयुक्तांचे आश्वासन
ठाणे : ठाणे महापालिकेत जन्म दाखला दुरुस्तीच्या नावाखाली चार हजार बोगस दाखले तयार करण्यात आल्याचा खळबळजनक आरोप माजी खासदार किरीट सोमैय्या यांनी केला आहे. महापालिकेच्या जन्म-मृत्यू विभागाने मात्र हा आकडा केवळ ७०० इतकाच असल्याचा खुलासा केल्यावरून खडाजंगी झाल्याचे सोमैय्या यांनी सांगितले.
भाजपा नेते किरीट सोमैय्या हे आज महापालिका आयुक्त सौरभ राव यांची भेट घेण्यासाठी आले होते. त्यानंतर पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले कि पहिल्यांदा जन्म-मृत्यू नोंदी संदर्भात महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सात हजार बनावट नोंदी असल्याचे सांगितले होते, परंतु आता बनवाबनवी करून केवळ सातशेच जन्म-मृत्यू दाखले दुरुस्त करून दिल्याचे अधिकाऱ्यांनी बैठकीत सांगितले. त्यावरून अधिकारी आणि आमच्या शिष्टमंडळाची खडाजंगी झाल्याचे सोमैय्या म्हणाले. आता चार हजार बोगस जन्म दाखल्याचे पुरावे दिले असून महापालिका आयुक्त त्याची स्वतः चौकशी करणार असून वेळ पडल्यास वेगळी समिती स्थापन केली जाईल, असे आश्वासन आयुक्त यांनी दिल्याचे सोमैय्या यांनी सांगितले.
महापालिकेतील शिवसेना आणि भाजपा यांच्या संघर्षाबाबत ते म्हणाले कि राष्ट्रीय प्रश्नांवर आमचे दोन्ही पक्ष एकत्र येतात. मुलुंड येथिल खार जमिनीवर धारावीच्या लोकांचे पुनर्वसन केले जाणार आहे. त्याला विरोध सुरु आहे. त्याबाबत सोमैय्या म्हणाले कि ही जागा बिल्डरच्या घशात घालण्यास माझा विरोध होता, परंतु आता राज्य सरकार त्या जागेवर परवडणारी घरे बांधणार आहे, त्यामुळे गरिबांना घरे मिळतील.
यावेळी सोमैय्या यांच्याबरोबर उपमहापौर कृष्णा पाटील, भाजपा गटनेते मुकेश मोकाशी, नगरसेवक संजय वाघुले, सीताराम राणे उपस्थित होते.
ठाणे शहरात बांगलादेशी नागरीक बेकायदेशीरपणे वास्तव्य करून आहेत. शहरात वाढलेल्या फेरीवाल्यांच्या संख्येत बांगलादेशी नागरिकांचा आकडा मोठा आहे. या नागरिकांनी बोगस जन्म दाखल्यांच्या आधारे रेशनकार्ड, आधारकार्ड, पॅन कार्ड मिळवल्याचा आरोप होत आहे. महापालिकेतील बोगस जन्म दाखले रद्द केल्यास या बांगलादेशी नागरिकांवर कारवाई करणे शक्य होणार असल्याचे बोलले जात आहे.