सुर्या योजनेच्या सुरक्षेत खोट; ठेकेदार-सल्लागारावर बोट

भाईंदर : मीरा-भाईंदर महानगरपालिका क्षेत्रामध्ये ‘सुर्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजना’ प्रगतीपथावर असून या योजनेअंतर्गत जलकुंभ, मुख्य जलवाहिन्या, वितरण व्यवस्था तसेच फिडर लाईन उभारणीची विविध कामे सुरू आहेत. या कामांमधील सुरक्षेतील त्रुटींची गंभीर दखल घेऊन ठेकेदार व तांत्रिक सल्लागारावर दंडात्मक कारवाई करण्यात आल्याचे शहर अभियंता दीपक खांबित यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर केले.

मीरा-भाईंदर महानगरपालिका क्षेत्रामध्ये केंद्र शासन पुरस्कृत अमृत 2.0 अभियानांतर्गत मंजूर ‘सुर्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजना’ प्रगतीपथावर असून या योजनेअंतर्गत जलकुंभ, मुख्य जलवाहिन्या, वितरण व्यवस्था तसेच फिडर लाईन उभारणीची विविध कामे सुरू आहेत. विकासकामांच्या अनुषंगाने महानगरपालिकेच्या निदर्शनास आले आहे की, काही कामांच्या ठिकाणी आवश्यक सुरक्षा उपाययोजनांच्या अंमलबजावणीत गंभीर त्रुटी आढळून आल्या आहेत. याबाबत संबंधित ठेकेदार व तांत्रिक सल्लागार यांना वेळोवेळी तोंडी सूचना तसेच लेखी नोटिसा बजावून आवश्यक सुधारणा करण्याचे निर्देश देण्यात आले होते. तथापि, अपेक्षित प्रमाणात सुधारणा न झाल्यामुळे काही अपघाताच्या घटना घडल्या असून त्यामध्ये कामगार तसेच नागरिक जखमी झाल्याची बाब महानगरपालिकेने अत्यंत गांभीर्याने घेतली आहे. या घटनांची तत्काळ दखल घेत महानगरपालिकेमार्फत संबंधित ठेकेदार व तांत्रिक सल्लागार यांना सर्व कामांच्या ठिकाणी सुरक्षा उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार प्रत्येक कामाच्या ठिकाणी मजबूत बॅरिकेडिंग, उंच संरक्षक पत्रे, सुरक्षा जाळी, आवश्यक चेतावणी फलक, परावर्तित सूचना फलक, पुरेशी प्रकाश व्यवस्था, सुरक्षित प्रवेश व्यवस्था तसेच आवश्यक सुरक्षा साधनांची उपलब्धता सुनिश्चित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच प्रत्येक कामाच्या ठिकाणी जबाबदार अभियंता, पर्यवेक्षक व सुरक्षा अभियंता यांची प्रत्यक्ष उपस्थिती बंधनकारक करण्यात आली आहे.

महानगरपालिकेमार्फत संबंधित प्रकरणाचा सखोल आढावा घेण्यात आला असता, निविदेतील अटी व शर्ती तसेच करारामधील सुरक्षा विषयक तरतुदींचे प्रथमदर्शनी उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आले. त्यानुषंगाने संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून, मे. इगल इन्फ्रा इंडिया लिमिटेड या ठेकेदारावर पाच लाख रुपये तसेच कामांवर देखरेख करणारे तांत्रिक सल्लागार मे. फोरस्ट्रेस इन्फ्राकॉन लिमिटेड यश इनोव्हेटिव्ह सोल्युशन (जे.व्ही.) यांच्यावर एक लाख रुपये इतका दंड आकारण्यात आला आहे.

मीरा-भाईंदर महानगरपालिका नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत असून, सुरू असलेल्या सर्व विकासकामांमध्ये सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन होणे बंधनकारक आहे. यापुढेही अशा प्रकारचा निष्काळजीपणा अथवा सुरक्षा नियमांचे उल्लंघन आढळल्यास संबंधित ठेकेदार व तांत्रिक सल्लागारांविरुद्ध करारातील अटींनुसार अधिक कठोर दंडात्मक तसेच प्रशासकीय कारवाई करण्यात येईल.

सर्व विकासकामांची नियमित पाहणी करून सुरक्षा उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यात येणार असून, नागरिकांच्या सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असे महानगरपालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.