प्रकल्प प्रमुख आरती परब यांनी सादर केला सिग्नल शाळेवर प्रबंध
ठाणे: श्रीलंकेत पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय शिक्षण परिषदेत सिग्नल शाळेच्या प्रयोगावर आधारित प्रबंध सादर झाला. सिग्नल शाळेच्या प्रयोगाच्या सादरीकरणाने भारतीय खंडातील शिक्षणातील प्रयोगशिलता अधोरेखीत झाली. परिषदेत सिग्नल शाळेच्या प्रबंध मांडतांना तिरंगा झळकला आणि या तिरंग्याच्या साक्षीने जणू आंतरराष्ट्रीय पटलावर सिग्नल शाळेचा झेंडा फडकला.
जगभरातील शिक्षण क्षेत्रातील पथदर्शी प्रयोगांवर आधारित शिक्षण परिषद दरवर्षी आयोजित केली जाते. यंदाची शिक्षण परिषद श्रीलंकेत झाली. स्थलांतरीत, शाळाबाह्य, प्रमाणभाषा अवगत नसलेल्या मुलांना शिक्षणाच्या मूळ प्रवाहात आणण्यासाठी समर्थ भारत व्यासपीठ आणि ठाणे महानगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने १० वर्षांपुर्वी सुरू झालेल्या सिग्नल शाळेची निवड सादरीकरणासाठी झाली होती. श्रीलंकेतील कोलंबो येथे झालेल्या या परिषदेत विविध देशातील पथदर्शी प्रयोगांचे सादरीकरण झाले. सिग्नल शाळेच्या प्रकल्प प्रमुख आरती परब यांनी सिग्नल शाळेवरील प्रबंध सादर केला. तसेच दहा वर्षे सिग्नल शाळेत अवलंबलेल्या प्रयोगशिल शिक्षणावर आधारित पुस्तकाचे प्रकाशन देखील या परिषदेत करण्यात आले.
परिषदेतला श्रीलंकेच्या युना प्रांताचे राज्यपाल जे एम कपीला जयशेखरा, युना प्रांताच्या मुख्य सचिव अनुषा गोरूला फर्नाडो, शिक्षण सचिव निहाल गुणरत्ने, अतिरिक्त संचालक शिक्षण जे.एम. सेनाधिरा, पेराडेनिया विद्यापीठाचे वॉल्टर सेनेविरत्ने, सिपविन एज्युकेशन इन्स्टिट्यूटचे संस्थापक गुणपाला रत्नसेकरा, सी फॉर सिनर्जीच्या उषावती शेट्टी आदी मान्यवर व विविध देशातील शिक्षण विषयातील तज्ज्ञ उपस्थित होते.
श्रीलंकेतील कोलंबो व उना येथे १ ते ६ जानेवारी दरम्यान गुणवत्तापूर्ण शिक्षण या विषयावर आधारित ही शिक्षण परिषद झाली. परिषदेच्या निमित्ताने श्रीलंकेतील विविध विद्यापीठांना भेटी, तेथील शैक्षणिक प्रयोगाची देवाणघेवाण व शिक्षण क्षेत्रातील मुलभुत संकल्पनांच्या विकासासाठी आंतर राष्ट्रीय सहकार्य या विषयावर भर देण्यात आला. भारतातील सिग्नलवरील मुलांना शिक्षणाच्या मूळ प्रवाहात आणण्यासाठीचा सिग्नल शाळेचा प्रयोग विविध अविकसित, विकसनशिल तसेच विकसित देशातील शाळाबाह्य मुलांसाठी संजिवनी ठरेल असा विश्वास या परिषदेत आंतरराष्ट्रीय अभ्यासकांनी व्यक्त केला.