ठाणे : डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) तर्फे घेण्यात येत असलेल्या यु.पी.एस.सी. नागरी सेवा पूर्व तथा मुख्य परीक्षेचे पूर्वतयारी प्रशिक्षण या योजनेंतर्गत केंद्रीय सशस्त्र पोलीस दल 2023 साठी बार्टीच्या पाच विद्यार्थ्यांची असिस्टंट कमांडंटपदी निवड करण्यात आली आहे. येत्या मे अखेरपर्यंत त्यांचे हैद्राबाद येथे ट्रेनिंग सुरु होणार आहे. या यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये व्यंकट गायकवाड-रॅंक 39, अजित खरात-रॅंक 220, मयुर रंगारी-रॅंक 248, रोशन कडू-रॅंक 284 आणि अजय इट्खरे-रॅंक 292 या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
संघ लोकसेवा आयोग (युपीएससी) केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात भरतीसाठी (असिस्टंट कमांडंट) परीक्षा आयोजित करते. सीआरपीएफ हे गृह मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या केंद्रीय पोलीस संघटनांचे सामूहिक नाव आहे. या दलांमध्ये सीमा सुरक्षा दल (बीएसएफ), केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ), केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (सीआयएसएफ), भारत-तिबेट सीमा पोलीस (आयटीबीपी) आणि सशस्त्र सीमा बल (एसएसबी) यांचा समावेश होतो. या दलांची भूमिका प्रामुख्याने अंतर्गत धोक्यांपासून राष्ट्रीय हिताचे रक्षण करणे आहे.
युपीएससीद्वारा आयोजित केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (असिस्टंट कमांडंट) परीक्षेमार्फत सीएपीएफमध्ये अधिकाऱ्यांची भरती केली जाते. बार्टीमार्फत अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी यु.पी.एस.सी.-नागरी सेवा पूर्व तथा मुख्य परीक्षेचे पूर्वतयारी प्रशिक्षण योजनेंतर्गत पूर्व तसेच मुख्य परीक्षेचे प्रशिक्षण दिले जाते. प्रशिक्षण योजनेत विद्यार्थ्यांची निवड गुणवत्तेच्या आधारावर केली जाते. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना मासिक विद्यावेतन, मोफत प्रशिक्षण, प्रवास भत्ता दिला जातो.
बार्टीमार्फत यु.पी.एस.सी.नागरी सेवा पूर्व तथा मुख्य परीक्षेचे पूर्वतयारी प्रशिक्षण योजनेत दिल्ली येथील कोचिंग संस्थामध्ये कोचिंग, नागरी सेवा (प्राथमिक) परीक्षा उत्तीर्ण झालेल्या आणि (मुख्य) परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना आर्थिक सहाय्य. व्यक्तिमत्व चाचणीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना आर्थिक सहाय्य योजना राबविल्या जातात. या सर्व योजनांची विस्तृत माहिती बार्टीच्या www.barti.in या वेबसाईटवर उपलब्ध आहे. विद्यार्थ्यांनी या सर्व योजनांची माहिती घेऊन त्याचा लाभ, असे आवाहन बार्टीचे महासंचालक सुनील वारे यांनी केली आहे.