उल्हासनगरमध्ये गोळीबार; दोन जण गंभीर जखमी

​उल्हासनगर: शहरातील साईनाथ कॉलनी परिसरात जुन्या वैमनस्यातून दोन गटांमध्ये झालेल्या वादातून गोळीबाराची घटना घडली आहे. या घटनेत योगेश मिश्रा आणि धीरज विठाले हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे गणेशोत्सवाच्या काळात परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

बुधवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास योगेश मिश्रा आणि धीरज विठाले हे साईनाथ कॉलनीतील सार्वजनिक शौचालयात गेले असताना, आरोपी मोनू शेख आणि त्याच्या साथीदारांनी त्यांच्यावर हल्ला केला. सुरुवातीला त्यांनी चॉपरने हल्ला केला आणि त्यानंतर त्यांच्यावर गोळीबार केला. या गोळीबारात योगेश मिश्रा यांच्या छातीत गोळी लागल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना तत्काळ ठाण्यातील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. धीरज विठाले हे देखील या हल्ल्यात गंभीर जखमी झाले आहेत.

​पोलिसांच्या प्राथमिक अंदाजानुसार, योगेश मिश्रा आणि आरोपी मोनू शेख यांच्यात जुना वाद होता. याच वादातून हा गोळीबार झाल्याचे मानले जात आहे. आरोपी मोनू शेख याची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचेही समोर आले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी घटनास्थळी धाव घेतली. गणेशोत्सवाच्या धामधुमीत अशा प्रकारे गोळीबाराची घटना घडल्याने परिसरात तणाव आणि भीतीचे वातावरण आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.