स्फोटाच्या आवाजामुळे बदलापूर हादरले
बदलापूर : बदलापूरला एका रासायनिक कंपनीला भीषण आग लागून आगीत चार कामगार जखमी झाले तर एका कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना आज पहाटेच्या सुमाराला घडली.
बदलापूरच्या खरवई एमआयडीसीमधील विके रासायनिक कंपनीमध्ये आज पहाटे चारच्या सुमाराला अचानक आग लागली. कंपनीमध्ये रासायनिक द्रव्याने भरलेले ड्रम होते. त्यांचा मोठ्या प्रमाणात स्फोट झाल्याने त्या आवाजाने आजूबाजूचा परिसर हादरला. आगीत केमिकलच्या टाक्यांचा स्फोट झाल्याने चार ते पाच किलोमीटरपर्यंतच्या परिसरात या स्फोटाचे हादरे बसले.
या भीषण आगीच्या घटनेत आकाश मोरे, प्रवीण रेवाळे, सुरेश गायकवाड, गिरीश कांबळे यांचा जखमींमध्ये समावेश असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. बबन मोहिते या कामगाराचा या भीषण आगीच्या घटनेत दुर्दैवी मृत्यू झाला.
विके कंपनीशेजारी असलेल्या दोन कंपन्याचे देखील आगीमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून परिसरातील वाहनांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
या घटनेची माहिती मिळताच बदलापूर तसेच अंबरनाथ अग्निशमन दल, आणि अंबरनाथ एमआयडीसी अग्निशमन दलाने दोन तास शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवल्याचे अंबरनाथ अग्निशमन दलप्रमुख डॉ. भागवत सोनोने यांनी सांगितले.