ठाणे: ठाणे महापालिकेत पुन्हा एकदा आर्थिक चणचण निर्माण झाली असून पाणी पुरवठा करणाऱ्या प्राधिकरणाची जवळपास १२ कोटींची बिले थकली असल्याची माहिती समोर आली आहे. कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांच्या पगाराला प्राधान्य देण्यात आल्याने बिले अदा करता आली नसल्याचे कळते.
ठाणे शहराला रोज ५८५ दशलक्ष लीटर इतका पाणीपुरवठा होतो. त्यामध्ये महापालिकेच्या स्वत:च्या पाणीपुरवठा योजनेतून २५० दशलक्ष लीटर, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून १३५ दशलक्ष लीटर, स्टेम कंपनीकडून ११५ दशलक्ष लीटर आणि बृहन्मुंबई महापालिकेकडून ८५ दशलक्ष लीटर असा पाणी पुरवठा करण्यात येतो. ठाणे महापालिकेच्या स्वत:च्या पाणीपुरवठा योजनेतून २५० दशलक्ष लीटर इतका पाणी पुरवठा शहराच्या विविध भागात करते. त्यामुळे शहरातील हा पाण्याचा महत्वाचा स्रोत मानला जातो. या पाणीपुरवठा योजनेसाठी महापालिका भातसा नदीच्या पात्रावरील पिसे बंधाऱ्यातुन पाणी उचलते आणि त्याचा शहरात पुरवठा केला जातो.
ठाणे महापालिकेच्या स्वतःच्या योजनेमधून पाणीपुरवठा होत असला तरी हे पाणी पुरेसे नसल्याने स्टेम, एमआयडीसी आणि बृहन्मुंबई महापालिकेकडून ठाणे महापालिकेला प्रत्येक महिन्याला पाणी विकत घ्यावे लागते. यासाठी ठाणे महापालिकेला प्रत्येक महिन्याला १२ ते १३ कोटी रुपये या प्राधिकरणांना मोजावे लागतात.
सध्या महापालिकेला पुन्हा एकदा आर्थिक चणचण जाणवू लागल्याने ही प्राधिकरणाची बिलेही थकली आहेत. लवकरच ही बिले देण्यात येतील, अशी माहिती पालिकेच्या सूत्रांनी दिली आहे.
ठामपाच्या तिजोरीत अवघे ४० कोटी शिल्लक
ठाणे महापालिकेच्या तिजोरीत सध्याच्या घडीला अवघे ४० कोटीच शिल्लक असून आपत्कालीन परिस्थितीमध्ये तिजोरीत ही रक्कम असणे आवश्यक आहे. दुसरीकडे दैनंदिन स्वच्छता करणाऱ्या कंत्राटी कामगारांची देखील ५ ते ६ कोटींची बिले शिल्लक असून त्यांची बिले देण्यासाठी ही प्राधान्य देण्यात येत आहे. त्यामुळे सध्या आर्थिक घडी बसवण्यात ठाणे महापालिकेला तारेवरची कसरत करावी लागत आहे.
असा होतो पाणीपुवठा
प्राधिकरण पाणीपुरवठा रक्कम (प्रती महिना )
एमआयडीसी १३५ एमएलडी चार कोटी
स्टेम ११५ एमएलडी ५.११ कोटी
बृहन्मुंबई महापालिका ८५ एमएलडी ३ कोटी
ठामपाची स्वत:ची योजना
२५० –
एकूण ५८५ एमएलडी १२ कोटी