आणखी चार जणांवर कारवाईची शक्यता
ठाणे: कळवा येथिल शिवाजी महाराज रुग्णालयातील मृत्यू प्रकरणी दोन डॉक्टरांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली असून आणखी चार जणांच्या विरोधात कारवाईची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सहयोगी प्राध्यापक डॉ. दीपा बंजन आणि सहायक प्राध्यापक डॉ. महेश मोरे असे निलंबित करण्यात आलेल्या डॉक्टरांची नावे आहेत. १८ऑगस्ट रोजी कळवा येथिल रुग्णालयात एकाच दिवशी १८ रुग्णांचा मृत्यू झाला होता. तीन दिवसांत सुमारे ३५ रुग्ण दगावले होते. त्याची गंभीर दखल घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रुग्णालयातील रुग्णांच्या मृत्यूची चौकशी लावली होती. त्याचा अहवाल राज्य शासनाला सादर केला होता. त्या अहवालाबाबतचे आणि दोन डॉक्टरांविरोधात कारवाई प्रस्तावित करण्यात आल्याचे वृत्त ठाणेवैभवने प्रथम प्रसिद्ध केले होते, ती बातमी खरी ठरली आहे.
नागपूर येथिल अधिवेशनात कळवा रुग्णालयातील मृत्यू प्रकरणाचे पडसाद उमटले होते. त्याची दखल घेऊन महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी आज त्यांना निलंबित केले. आणखी चार जणांच्या विरोधात कारवाई केली जाणार आहे. त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
कळवा रुग्णालयाच्या अहवालात रुग्णालयातील कामकाजाबद्दल काही सूचना करण्यात आल्या आहेत. त्याची देखील अंमलबजावणी आयुक्त श्री. बांगर यांनी सुरु केली आहे.
रुग्णालयात मोठ्या प्रमाणावर रुग्णांचा मृत्यू झाल्यानंतर राज्यातील सर्वच पक्षातील पदाधिकाऱ्यांनी नेत्यांनी रुग्णालयाला भेट देऊन चौकशीची मागणी केली होती. आरोग्य विभागाच्या सचिव, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हाधिकारी, महापालिका आरोग्य विभागाचे उपायुक्त यांची चौकशी समिती नियुक्त करण्यात आली होती. या समितीने रुग्णालयात प्रत्यक्ष रुग्णांचे नातेवाईक, वॉर्डबॉय, परिचारिका, डॉक्टर यांची चौकशी केली होती. त्याचा अहवाल तयार करण्यात आला होता.