किन्हवली: शहापूर तालुक्यातील किन्हवली भागातील सावरोली या ग्रामपंचायत क्षेत्रामधील नामपाडा लघुपाटबंधारे प्रकल्पाच्या कामासाठी नव्या प्रशासकीय व आर्थिक मान्यतेनंतर सुमारे २७ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
या कामाची निविदा प्रक्रिया सुरू झाली असून २०२६ या अखेरपर्यंत प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती कार्यकारी अभियंता, पाटबंधारे प्रकल्प बांधकाम विभाग, भातसा प्रकल्प वसाहत शहापूर यांनी दिली आहे.
कोकण पाटबंधारे विकास महामंडळ, ठाणे यांच्या अंतर्गत नामपाडा लघु पाटबंधारे प्रकल्प २००९ ला कामाला सुुरुवात करण्यात आली होती. मात्र प्रकल्पासाठी लागणारी वनविभागाची 38.98 हेक्टर वनजमीन हस्तांतरित करून त्याची केंद्रीय वनविभागाकडून अंतिम मंजुरी न घेताच काम सुरू केल्याने वनखात्याने सदरचे काम बंद करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे 2012 पासून नामपाडा प्रकल्प अडकला होता.
या प्रकल्पास लागणाऱ्या वनजमिनीच्या बदल्यात मौजे वाकला, ता. वैजापूर,जि. औरंगाबाद येथे सर्वे क्र.641 मधील 10.20 हेक्टर व मौजे साजे, ता. माणगाव, जि. रायगड येथे सर्वे क्र.92 आणि 100 मधील 28.78 हेक्टर जमीन वनविभागाला वर्ग करण्यात आली होती. संबंधित वनजमिन हस्तांतरणास अंतिम मंजुरी दिल्यानंतर नामपाडा प्रकल्पासाठी आपटे ग्रामपंचायत क्षेत्रातील सर्वे क्र.273, 205/1 मधील 31.08 हेक्टर व सावरोली(सो) ग्रामपंचायत क्षेत्रातील 324, 52, 64, 73, 71, 36, 50, 78, 101/ए, 15 या सर्वे क्रमांकांतील 7.90 हेक्टर राखीव व संवर्धित वनजमिन नामपाडा प्रकल्पाला वर्ग केली आहे. नुकतेच या धरणासाठी 27 कोटी निधी कोकण पाटबंधारे विकास महामंडळातर्फे मंजूर करण्यात आले आहेत. त्यामुळे हे धरण आता भविष्यात पूर्ण होऊ शकते.
या धरणामुळे किन्हवली भागातील नांदगाव सावरोलीसह इतर १० गावांतील हजारो शेतकऱ्यांना याचा फायदा होऊ शकतो. शेतीचे मोठे क्षेत्र सिंचनाखाली येऊ शकते.