नवी मुंबई : कल्याण तालुक्यातील खोणी गटात असणारी चौदा गावे आता नवी मुंबई महापालिका हद्दीत समाविष्ट करणारी अधिसूचना शासनाने जारी केली आहे. या सूचनेतील आदेशानुसार आता शिळफाट्यानजीक असणारी चौदा गावे आता यापुढे नवी मुंबई मनपा हद्दीत समाविष्ट होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
ठाणे ग्रामीण भागातील या चौदा गावांचा नवी मुंबई महापालिका हद्दीत समावेश झाल्याने आता या गावातील लोकप्रतिनिधी आगामी काळात महापालिका सभागृहात निवडणूक झाल्यानंतर बसलेले बघण्यास मिळतील.
दुसऱ्या सार्वत्रिक निवडणुकीत या चौदा महसुली गावांचा समावेश नवी मुंबई महापालिकेत करण्यात आला होता, मात्र या निर्णयास स्थानिक ग्रामस्थांचा विरोध असल्याने मालमत्ता कर वसुलीसह अन्य करांच्या वसुलीसही ग्रामस्थांनी विरोध केला. या चौदा गावांतील हजारो रहिवाशांच्या मोर्चाने आक्रमक रूप धारण करत थेट महापालिका मुख्यालयावर दगडफेक केल्याने वातावरणात तणाव होता. ग्रामस्थांच्या विरोधांनंतर ही गावे नवी मुंबई महापालिकेतून वगळण्यात आली होती. यानंतर पुन्हा ही गावे महापालिका हद्दीत समाविष्ट करून घेण्यासाठी येथील ग्रामस्थांनी २०१५ पासून मागणी धरली. त्यानंतर शासकीय पातळीवर याबाबत हालचाली सुरु होत्या. २०२२ मध्ये महविकास आघाडी सरकारमध्ये ही गावे नवी मुंबईत समाविष्ट करण्याबाबत निर्णय झाला. मात्र त्याची अंतिम अधिसूचना काढण्यात आली नव्हती.
अखेरीस याबाबत अधिसूचना राज्यपाल मंजुरीनंतर काढण्यात आली आहे. याबाबतची सूचना ७ मार्च २०२४ रोजी जाहीर करण्यात आली आहे. दहिसर, मोकाशी, वालिवली, पिंपरी, निघू, नावाळी, वाकळण, बामार्ली, नारिवली, बाळे, नागाव, भंडार्ली, उत्तर शीव, गोटेघर या चौदा गावांचा समावेश आता नवी मुंबई शहरात असेल.
या निसर्गरम्य गावांमध्ये प्रामुख्याने आगरी-कोळी भूमिपुत्र आणि कोयना प्रकल्पातील बाधित जनतेचे पुनर्वसन करण्यात आले आहे. खोणी गटात येणारी ही गावे कल्याण आणि ठाणे महापालिका निवडणूक क्षेत्रात मोडतात. ऐन निवडणुकीच्या आधीच या गावांचा समावेश नवी मुंबई महापालिका हद्दीत करण्यात आला असला तरी विधानसभा आणि लोकसभा क्षेत्रात कोणताही बदल केल्याचे निर्देश अद्याप देण्यात आलेले नाहीत, मात्र ही गावे ठाणे जिल्ह्यातील खोणी गटातून वगळण्यात आल्याचे अधिसूचनेत स्पष्ट करण्यात आले आहे. शासनाच्या या अधिसूचनेची तत्काळ प्रभावाने अमलबजावणी करताना जिल्हा परिषद आणि पंचायत समितीशी संबंधित मालमत्ता आणि इतर प्रशासकीय बाबी महापालिका प्रशासनाकडे सुपूर्द करण्याबाबत देखील निर्देश देण्यात आहेत.
कल्याण तालुक्यातील १४ गावे नवी मुंबईत समाविष्ट करावीत म्हणून १४ गाव विकास समिती, येथील ग्रामस्थ मागील आठ वर्षापासून शासनासोबत पाठपुरावा करत होते. याबाबत २०२२ मध्ये निर्णय झाला होता. याबाबत अंतिम अधिसूचना काढली नव्हती. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आम्हाला दिलेला शब्द पाळला असून ही गावे नवी मुंबईत समाविष्ट करण्याबाबत अंतिम अधीसूचना काढली, त्यामुळे येथील ग्रामस्थांच्या लढ्याला अखेर यश आले आहे, अशी प्रतिक्रिया १४ गाव विकास समितीचे अध्यक्ष लक्षण पाटील यांनी दिली.