पावणेदोन लाख श्री मूर्तींची होणार स्थापना

ठाणे पोलिस आयुक्तालय सज्ज

ठाणे: ठाणे पोलिस आयुक्तालय हद्दीत बुधवार २७ ऑगस्ट रोजी एक लाख ७३,१६९ गणेशमूर्तींची प्राणप्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. यात घरगुती एक लाख ५६,७८२, सार्वजनिक १०६० आणि १५,३२७ गौरी मातेच्या मूर्तींचा समावेश आहे.

ठाणे पोलिस आयुक्तालय गणेशोत्सवासाठी सज्ज झाले असून पाचही परिमंडळात चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला असून राज्य राखीव बलाचीही मदत घेण्यात येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार ठाणे पोलिस आयुक्तालय क्षेत्रात परिमंडळ १ ठाणे मध्ये दीड दिवसाचे घरगुती ४१३५, पाच दिवसाचे सार्वजनिक चार आणि घरगुती १४५४, सात दिवसांचे सार्वजनिक २२ घरगुती गणपती ५४०० तर गौरी १७८२ आहेत. नऊ आणि दहा दिवसांचे सार्वजनिक १०१ आणि घरगुती ४४८२ तर २१ दिवसांचे घरगुती २५ गणपती आहेत.

परिमंडळ २ भिवंडीमध्ये दीड दिवसांचा सार्वजनिक एक, घरगुती ४७९०, पाच दिवसांचे सार्वजनिक दोन, घरगुती ४४७, सात दिवसांचे सार्वजनिक ३०, घरगुती गणपती ७०१३, गौरी ८८८, आठ दिवसांचे घरगुती ८५, नऊ आणि दहा दिवसांचे सार्वजनिक १५०, घरगुती ३९८० तर २१ दिवसांचे घरगुती आठ गणपती विराजमान होणार आहेत.

परिमंडळ ३ कल्याणमध्ये दीड दिवसांचा सार्वजनिक एक, घरगुती १३,०२०, तीन दिवसांचे घरगुती ९०, पाच दिवसांचे २७, घरगुती ७८३८, सहा दिवसांचे घरगुती १३१७, सात दिवसांचे सार्वजनिक ५६, घरगुती ८५१८ आणि ६५०२ गौरी, आठ दिवसांचे सार्वजनिक ३३, नऊ आणि दहा दिवसांचे सार्वजनिक १७२ तर घरगुती १४,३३० गणेश मूर्तींची स्थापना होणार आहे.

परिमंडळ ४ उल्हासनगरमध्ये दीड दिवसांचे एक, घरगुती ९९८०, तीन दिवसांचे घरगुती १७८५, पाच दिवसांचे सार्वजनिक सात, घरगुती ९७९०, सहा दिवसांचे सार्वजनिक दोन, घरगुती ७६५५, सात दिवसांचे सार्वजनिक ३१, घरगुती ५०२५ तर गौरी ४४८५, नऊ आणि दहा दिवसांचे सार्वजनिक २२२, आणि घरगुती १५,२२६ गणेशाची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे.

परिमंडळ ५ वागळे इस्टेटमध्ये दीड दिवसाचे सार्वजनिक तीन, घरगुती ११,७५३, पाच दिवसांचे सार्वजनिक नऊ, घरगुती ३३४०, सहा दिवसांचे सार्वजनिक तीन, घरगुती १४२२, सात दिवसांचे सार्वजनिक ३४, घरगुती ८३३८ आणि गौरी, १६७०, नऊ आणि दहा दिवसांचे सार्वजनिक १४९, घरगुती ५५१७ तर २१ दिवसांचे घरगुती १९ श्री मूर्तींची प्राणप्रतिष्ठा होणार आहेत.

ठाणे पोलिस आयुक्तालय क्षेत्रात सार्वजनिक १०६०, घरगुती गणपती एक लाख ५६,७८२ आणि १५,३२७ गौरी गणेशभक्तांचा पाहुणचार घेणार आहेत.

प्राणप्रतिष्ठापनेसाठी मध्यान्हकाल उचित-सोमण

श्री गणेशाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यासाठी सकाळी ११.२५ ते दुपारी १.५४ हा मध्यान्हकाल उचित असल्याची माहिती ज्येष्ठ खगोल अभ्यासक आणि पंचांगकर्ते दा. कृ.सोमण यांनी दिली. तसेच पुढच्या वर्षी बाप्पा तब्बल १८ दिवस उशिराने येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

यावर्षी बुधवार २७ ॲागस्ट रोजी मध्यान्हकाल सकाळी ११-२५ ते दुपारी १-५४ पर्यंत आहे. यावेळेत श्री गणेशमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करून षोडशोपचार पूजा करावी. या वेळेत शक्य झाले नाही तर सूर्योदयापासून दुपारी १-५४ पर्यंत गणेशमूर्ती स्थापना व पूजन करावे, असे श्री.सोमण म्हणाले.

यावर्षी रविवार ३१ ॲागस्ट रोजी सायंकाळी ५.२५ पर्यंत चंद्र अनुराधा नक्षत्रात असतांना ज्येष्ठा गौरी आणाव्यात. सोमवार १ सप्टेंबर रोजी ज्येष्ठा गौरींचे पूजन करावे आणि मंगळवार २ सप्टेंबर रोजी रात्री ९.५० पर्यंत मूळ नक्षत्रावर ज्येष्ठा गौरींचे विसर्जन करावे, अशी सूचनाही त्यांनी केली आहे.

गणेशमूर्ती विसर्जनाच्यावेळी ‘ गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या !’ अशी विनंती गणेशभक्त गणेशाला करीत असतात. परंतु पुढच्या वर्षी ज्येष्ठ अधिकमास येणार असल्याने गणपती बाप्पांचे आगमन १८ दिवस उशीरा म्हणजे सोमवार १४ सप्टेंबर २०२६ रोजी होणार आहे.