फेव्हिकोल का जोड हैं; दोस्ती कधीच तूटणार नाही

पालघरमध्ये एकनाथ शिंदे यांचा निर्वाळा

पालघर: आमच्या युतीत मिठाचा खडा एक वर्षापूर्वी टाकला होता, तो आम्ही फेकून दिला. माझी आणि देवेंद्र फडणवीसांची दोस्ती आताची नाही. ते आमदार आणि मी आमदार होतो. तेव्हापासून आमची मैत्री होती. हा फेव्हिकॉलचा जोड आहे, कितीही प्रयत्न केले तरी दोस्ती तुटणार नाही, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. ते पालघरमध्ये बोलत होते.

देवेंद्रजी यांच्या नेतृत्त्वात परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र नंबर वन होता, आता पुन्हा नंबर वन झाला आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं. पंचामृत अर्थसंकल्प म्हणत एकनाथ शिंदे यांनी फडणवीस यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला.

पालघरमध्ये आज शासन आपल्या दारी ही योजनेचा कार्यक्रम आज पालघरमध्ये पार पडला. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकाच हेलिकॉप्टरमधून पालघरच्या दिशेने रवाना झाले. जाहिरात वादानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आज पहिल्यांदाच एकाच मंचावर आले होते.

हे सरकार सर्वसामान्यांचं आहे. आमचं सरकार जनतेच्या दारात पोहोचतंय. आतापर्यंत 35 लाख लाभार्थ्यांपर्यंत आमचं शासन पोहोचलं. मी आणि उपमुख्यमंत्र्यांनी ठरवलं, आमच्या सरकारचे निर्णय लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. सुरुवातीला आम्ही दोघेच मंत्रिमंडळात होतो. आता त्यामध्ये अनेकांचा समावेश झाला. कोणाला वैयक्तिक लाभ होईल असा एकही निर्णय घेतला नाही. सगळे निर्णय जनतेसाठी घेतले, असं मुख्यमंत्री म्हणाले.

मुख्यमंत्री शिंदे पुढे म्हणाले की, “सरकारने घेतलेले निर्णय त्याचा लाभ घेण्यासाठी चकरा मारायला लागू नये म्हणून सरकारने संकल्प केला. निर्णय लोकांपर्यत पोहोचवा यासाठी हा खटाटोप आहे. लाभार्थ्यांना चाव्यांचं वाटप झालं. आधुनिक शेतीसाठी, आधुनिक तंत्रज्ञानासाठी आपण काम करत आहे. मी आणि उपमुख्यमंत्री सुरुवातीच्या मंत्रिमंडळात होतो. आम्ही सर्व सामान्यांच्या हिताचे निर्णय घेतले. पूर्वीची कॅबिनेट आणि आताच्या कॅबिनेटमध्ये आम्ही चांगले निर्णय घेतले आहेत. 2 लाख 12 हजार 683 लाभार्थ्यांना 212 कोटी रुपयांचा लाभ होणार आहे. हे सरकार 10 ते 11 महिन्यापासून स्थापन झाले त्याचा उद्देश एकच आहे, बदल घडवणे. आपण 300 ते 400 निर्णय घेतले. सर्वसामान्य माणूस केंद्रस्थानी मानून आपण निर्णय घेतले.”

उद्योगवाढीसाठी आपण अनेक निर्णय घेतले. आदिवासी व्यक्तीचे राहणीमान उंचावले पाहिजे हा उद्देश सरकारचा आहे. वर्सोवा ते विरार हा प्रकल्प आपण आणत आहोत. आदिवासी समाजाचे राहणीमान उंचावलं पाहिजे तसेच सर्वसामान्य लोकांचे जीवन उंचावले पाहिजे त्या साठी आम्ही प्रयत्न करतोय. नागपूर मुंबई हा गेमचेंजर प्रकल्प आहे. त्यांनी स्वप्न पाहिले आणि ते पूर्ण करण्याचे भाग्य आम्हाला लाभलं. अनेक प्रकल्प आहेत. आपलं सरकार स्थापन होण्यापूर्वी अनेक स्पीड ब्रेकर लागले होते. सरकार स्थापन झाल्यावर आम्ही सर्व स्पीड ब्रेकर बंद केले, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

आमचा प्रवास कालही एकत्र होता, आजही आहे आणि उद्याही आमचा प्रवास एकत्रच असेल. कारण आम्ही खुर्च्या तोडण्यासाठी, पदं मिळवण्यासाठी सरकार तयार केलेलं नाही, तर हे सरकार जनसामान्यांच्या जीवनात सामाजिक, आर्थिक परिवर्तन झालं पाहिजे म्हणून तयार केलं आहे. एखाद्या जाहिरातीमुळे किंवा कुणाच्या वक्तव्यामुळे या सरकारमध्ये कुठे काही होईल इतकं तकलादू हे सरकार नाही. हे जुनं सरकार नाही. जुन्या सरकारमध्ये कुणी आधी भाषण करायचं आणि कुणी नंतर भाषण करायचं यावरून गच्ची पकडणारे आम्ही पाहिले. मात्र, हे सरकार सामान्यांसाठी काम करणारं सरकार आहे.