मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाव घ्यायचा अवकाश आणि फेव्हिकोलचा खप रातोरात इतका वाढला की आज बाजारात त्याचा तुटवडा भासू लागला आहे. ही बातमी फेव्हिकोलच्या निर्मात्यांच्या कानावर पडताच त्यांनी सर्व कामगारांना विश्वासात घेऊन कारखाना तीन पाळ्यांमध्ये सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. मार्केटिंग डिपार्टमेंटच्या लोकांनाही तातडीने बोलावून घेण्यात आले आणि तुर्तास सर्व वर्तमानपत्रे आणि टी.व्ही. चॅनलवरुन जाहिरातींचे प्रसारण रद्द करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला. साक्षात मुख्यमंत्र्यांच्या मुखातून आपल्या उत्पादनाचे नाव बाहेर पडल्यावर वेगळ्या जाहीरातीची गरजच काय असा विचार या निर्णयामागे होता. थोडक्यात फेव्हिकोल कंपनीला सुगीचे दिवस आले होते. मागणी वाढल्यामुळे नफा वाढणार होताच आणि जाहिरातीवर होणाऱ्या खर्चात बचत झाल्यामुळे नफ्यावर नफा वाढणार होता!
राजकारण म्हणजे ‘वेस्ट ऑफ टाईम’असा सरसकट शेरा लोकशाहीची चिंता वाहणारे आणि मतदानाच्या दिवशी हमखास सहलीला निघून जाणारे जबाबदार नागरीक सरसकट मारत असतात. परंतु फेव्हिकोलच्या मालकाला विचाराले तर ते म्हणतील राजकारण म्हणजे ‘बेस्ट ऑफ टाईम’! काही वर्षांपूर्वी झंडू बाम असाच प्रसिध्दीच्या झोतात आला होता.
मलायका की मालविका अरोरा (बाय द वे ही सुध्दा पूर्व ठाण्यात म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या मतदार संघात रहात होती हा योगायोग बरे का!) हिच्यावर चित्रीत मुन्नी बदनाम हुई या दिलखेचक आयटम गाण्यात झंडू बामचा उल्लेख झाला होता. या बामचे निर्माते म्हणे त्यामुळे खवळले होते. त्यांनी ‘दबंग’ चित्रपटाविरुध्द कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही दिला होता. पुढे काय झाले ते माहीत नाही. परंतु झंडु बामची विक्री वाढली असणार नक्की आणि त्यामुळे गल्ला मोजत बसायचा की कोर्टात फुका वेळ घालवायचा यापैकी शहाणपणाचा निर्णय झाला असावा!. बामचे उत्पादन वाढले, तो लोकप्रिय झाला आणि त्यामुळे मालकाच्या (तो न लावता) वेदना दूर झाल्या ! फेव्हिकोलवाल्यांनी मात्र असा दांभिकपणा करण्याऐवजी आपल्या यशाचे श्रेय मुख्यमंत्र्यांना देऊन टाकलेले बरे असा विचार केला असावा!
राजकीय मंडळींच्या विविध सवयी, त्यांना चिकटेले असंख्य गुण-दोष यांचा विचार केला तर बाजारातील असंख्य उत्पादनांना सुगीचे दिवस येऊ शकतात. नेत्यांचा त्यासाठी खुबीने वापर करावा लागेल. उदाहरणार्थ पोटात अनेक गुपित साठवून ठेवल्यामुळे बध्दकोष्ठ अर्थात कॉन्स्टिपेशनचा त्रास होऊ शकतो. म्हणून गोळी खाल्ल्यावर गौप्यस्फोट झालेल्या त्या नेत्याची प्रसन्न मुद्रा या बद्धकोष्ठ निवारण औषधासाठी वापरायला काय हरकत आहे? राजकारणात खाणे हे अमर्याद असते त्यामुळे अपचनाची तक्रार नेहमीच होत असते. अशा वेळी भरपूर खा, पण आमची गोळी घ्या, अशी जाहीरात पाचक गोळ्यांचे निर्माते करु शकतील. कोणताही नेता उजळ चेहऱ्याने ही जाहिरात करायला तयार होईल की नाही हे सांगता येत नाही. पण त्यांचा चेहरा धुरकट दाखवून ही जाहिरात हमखास करता येऊ शकेल.
जे पक्ष आमचा पक्षच कसा सर्वांपेक्षा अधिक स्वच्छ असा दावा करतात त्यांनी ‘सर्फ’ निर्मा वगैरेची जाहीरात करायला हरकत नाही. सातत्याने रंग बदलणाऱ्या पक्षांनी स्केचपेन किंवा चित्रकलेत अथवा भिंतींवर लावण्यात येणाऱ्या रंगांची जाहिरात आपल्या आयाराम-गयाराम नेत्यांद्वारे करावी. अशा जाहिराती वास्तववादी तर वाटतीलच पण महागडे मॉडेल घेण्यापेक्षा प्रसिध्दीसाठी हपापलेले नेते अशी जाहिरात फुकटातच करतील!
नोटा मोजण्याच्या यंत्रांसाठी नेत्यापेक्षा दुसरे चांगले मॉडेल शोधूनही सापडणार नाही. नोटांच्या ढिगार्यात तोंडाची थुकी संपलेला, घामाघुम झालेला आणि नोटा मोजून-मोजून बोटांना बॅण्डएड लावणार नेता दाखवला तर ज्याच्या घरात यंत्राची गरज नाही तोही विकत घ्यायला पुढे येईल. दिवाणखान्यात एका कोपऱ्यात असे यंत्र ठेवले तर यजमानाकडे पहाण्याचा पाहुण्यांचा दृष्टीकोन बदलू शकतो.
सकाळ झाल्यापासून रात्री झोपेपर्यंत सतत चॅनलवाल्यांना मुलाखती देणारे नेते हॉल्स, व्हिक्स, गेला बाजार खो-गो ची जाहिरात उत्तम करु शकतील. त्यांच्या बोलण्यात खिचखिचाट नसण्याचे हे रहस्य यानिमित्ताने जनतेला समजू शकेल.
एका उत्पादनाची जाहिरात मात्र नेतेमंडळी कधीच करु शकणार नाहीत आणि ते म्हणजे घड्याळ. वेळ पाळणे हे ज्यांच्या पिंडातच नाही ते बोंबलायला घड्याळ विकत घेण्याचा आग्रह का धरतील?
जाता-जाता: काळ्या पैशाचे रुपांतर पांढऱ्यात करुन देऊ असा दावा कोणी वॉशिंग मशिनवाल्याने केला तर त्याची बरकत निश्चित आहे. अर्थात हे मशिन सप्टेंबरपूर्वी म्हणजे दोन हजारांच्या नोटा आहेत तोवरच बाजारात आणावे लागेल. नेत्यांची लाइन लागेल बघा! बाय द वे कोण म्हणतो भारत हा विकसनशील देश नाही! तुम्ही चुकीची उत्पादने चुकीच्या मार्गाने चुकीच्या लोकांना विकताय. ही मिश्टेक सुधारा आणि पहा कसा फेव्हिकॉल इफेक्ट येतो तुमच्या धंद्यात. लक्ष्मी पण पाणी भरून थकेल राव!!