डोंबिवलीत मोठागावमध्ये कोयता टोळीचा तरूणावर जीवघेणा हल्ला

डोंबिवली : दहशत, दमदाटीची भाषा करत मोठागाव भागात गेल्या काही दिवसांंपासून सात तरूणांची एक टोळी रात्रीच्या वेळेत फिरत आहे. या टोळीच्या हातात कोयते आणि लाकडी बांबू असतात. त्यांच्या मनात येईल त्या तरूण, इसमाला बेदम मारहाण करतात. अशाच एका तरूणावर या कोयता टोळीने जीवघेणा हल्ला करून त्याला गंभीररित्या जखमी केले आहे.

आकाश, आदर्श, महेंद्र, जाड्या, वरूण आणि त्यांचे इतर दोन साथीदार अशी ही टोळी रात्रीच्या वेळेत दुचाकीवरून मोठागाव भागात दहशत, दमदाटी, समोरून येणाऱ्या वाहनांना हुलकावण्या देत फिरत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. हर्षद अहिरे (२३) या तरूणाला या टोळक्याने गेल्या आठवड्यात कोयत्याचे वार करून जखमी केले तसेच लाकडी बांबूने बेदम मारहाण केली आहे. या टोळक्याशी हर्षदचा कोणताही वाद नसताना त्याला ही मारहाण करण्यात आली आहे. या मारहाण प्रकरणी हर्षदचा मित्र तानाजी सनस यांनी विष्णुनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.