बनावट सीबीआय अधिकारी अखेर जाळ्यात

‘स्पेशल छब्बीस’ स्टाईल फसवणूक उघड

उल्हासनगर: ‘सीबीआय अधिकारी’ असल्याचा बनाव, कमरेला बनावट पिस्तूल, हातात वॉकी-टॉकी आणि सोबत तरुणांची टीम घेऊन हॉटेल्सवर धाडसत्र राबवणाऱ्या भामट्याचा अखेर भंडाफोड झाला आहे.

ठाणे जिल्ह्यात गेली पाच वर्षे सुरू असलेल्या या थरारक फसवणूक प्रकरणाने ‘स्पेशल 26’ या चित्रपटाची आठवण करून दिली आहे. राजू पाटेकर नावाच्या आरोपीने बेरोजगार तरुणांना सीबीआयमध्ये नोकरीचे आमिष दाखवत लाखो रुपये उकळले, तसेच त्यांना बनावट ‘अंडरकव्हर ऑपरेशन’मध्ये सहभागी करून घेतले. अखेर विठ्ठलवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल करत या बनावट साम्राज्यावर कारवाई सुरू केली असून, या प्रकरणामुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे.

ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली विठ्ठलवाडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कोळी आणि पोलीस निरीक्षक (गुन्हे) चंद्रहार गोडसे यांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला. विठ्ठलवाडी पोलिसांच्या तपासात समोर आले की, आरोपी राजू पाटेकर हा स्वतःला सीबीआय अधिकारी म्हणून सादर करत होता. हॉटेल्स, जीन्स कारखाने आणि विविध व्यावसायिक आस्थापनांवर अचानक धाड टाकत तो अधिकृत तपास सुरू असल्याचे भासवत असे. त्याच्या सोबत असलेले तरुणही स्वतःला सरकारी पथकाचा भाग समजून या कारवायांमध्ये सहभागी होत होते. प्रत्यक्षात मात्र या सर्व धाडी बनावट असल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे.

या प्रकरणातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे आरोपीने ५० हून अधिक सुशिक्षित बेरोजगार तरुणांना नोकरीच्या आमिषाने आपल्या जाळ्यात ओढले. ‘सीबीआयमध्ये भरती’ आणि ‘गुप्त प्रशिक्षण’ देण्याच्या नावाखाली त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर पैसे उकळले गेले. या तरुणांना ‘अंडरकव्हर मिशन’चा भाग असल्याचे सांगून त्यांच्याकडून घरगुती कामे करून घेण्यात येत होती, तसेच बनावट धाडीत सहभागी करून घेतले जात होते.

पोलिसांनी शनिवारी आरोपीच्या घरासह विविध ठिकाणी छापा टाकत मोठ्या प्रमाणावर बनावट साहित्य जप्त केले आहे. यात सीबीआयचे बनावट ओळखपत्र, ‘राजमुद्रा’ बॅज, केरळ पोलीस शैलीतील चिन्हे, चिप असलेले आयडी कार्ड, वॉकी-टॉकी सेट, एअर गन आणि अनेक सिमकार्डचा समावेश आहे. याशिवाय ‘क्राइम ब्युरो इन्व्हेस्टिगेशन ट्रस्ट’ नावाच्या बनावट संस्थेचे कागदपत्रेही सापडली आहेत.

दरम्यान, या प्रकारामुळे बेरोजगार तरुणांना लक्ष्य करणाऱ्या फसवणूक टोळ्यांचे भयावह चित्र समोर आले असून, अशा गुन्हेगारांवर कठोर कारवाईची मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे.