महापालिका निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत आणि ते काहीसे अपेक्षितच होते असेही म्हणता येईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीन सामन्यांची ही मालिका जिंकून ‘मॅन ऑफ द मॅच’ होण्याचा मान तिसऱ्यांदा मिळवला आहे. लोकसभा, विधानसभा आणि त्यानंतर नगरपरिषदा आणि महापालिका अशी ही मालिका. भाजपाची घोडदौड विपक्षांना रोखता आली नसून आगामी काळात ती कशी थांबवावी यासाठी त्यांच्याकडे योजनाही नाही. त्यामुळे फडणविस यांची पकड महाराष्ट्रातील ग्रामीण तसेच शहरी भागांवर घट्ट होऊ लागली आहे. हा आत्मविश्वास पक्षाच्या एकला चालो रे साठी उपयुक्त ठरणार यात वाद नाही. परंतु त्याचा उपयोग निवडणूक काळात दिलेल्या विकास-प्रकल्पांच्या आश्वासनांच्या पूर्णतेत व्हावा अशी कौल देणाऱ्या जनतेची इच्छा असणार आहे.
भाजपा वर्तुळात जल्लोष होत असताना शिवसेना मात्र या सर्व घडामोडींकडे सावधपणे पाहत आहे. खरे तर ते त्यांचे मित्र, त्यामुळे त्यांनीही जल्लोषात सहभागी होणे अपेक्षित होते. परंतु तसे न होता मुंबईच्या महापौरपदासाठी त्यांनीच उलट आग्रही भूमिका घेतली आहे. भाजपामध्ये सर्व पर्यायांची आधीच चर्चा होत असते. बाळासाहेब ठाकरे यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे हेही त्यांना ठाऊक असणार आणि श्री. शिंदे असा पवित्रा घेणार याचाही त्यांना अंदाज असणार. त्यातून मार्ग कसा काढायचा ही योजनाही त्यांनी केली नसेल तरच नवल! त्यामुळे माध्यमातून महापौरपदावरून वातावरण तापत राहिले तरी तोडगे मात्र भाजपच्या ‘फ्रिज’मध्ये तयार असणार!
ही निवडणूक मुंबईसाठी मराठी मुद्द्यावरून तर उर्वरित मुंबई महानगर प्रादेशिक क्षेत्र हद्दीत विकासावर बेतलेली होती. मराठी माणसाची अस्मिता जपण्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांनी बहुचर्चित युती केली. उबाठाला मिळालेल्या यशाबद्दल संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. शिवसेनेच्या तुलनेत दुप्पट जागा मिळाल्यामुळे ते समाधानी असले तरी सत्ता गमावल्याचे दुःख त्यांना जरूर आहे. याचा अर्थ मराठी अस्मिता विरुद्ध विकास यामध्ये विकासाने बाजी मारली असा निघतो. भाजपाने त्यांच्याकडील मराठी मते विकासाच्या मुद्द्यावर आपल्याकडे वळवली , हे लक्षात घ्यावे लागेल. भाजपाने दोन प्रकारे दोन्ही सेनांची हवा काढली. शिंदे सेनेसमोर उबाठाचे उमेदवार रिंगणात ठेवल्याने त्यांना मराठी अस्मितेचा फायदा उठवता आला. भाजपाच्या जवळ असणाऱ्या शिंदे यांना विकासावर भर द्यावा लागला. अस्मिता की विकास असा संभ्रम मतदारांच्या मनात करणे हा भाजप च्या व्यूहरचनेचा भाग होता काय हे न कळे. शिवसैनिकांच्या मानसिकतेचा विचार भाजपाच्या ‘थिंक टॅंक’ने केलेला दिसतो. प्रतिस्पर्ध्याच्या उणिवा आणि जमेच्या बाजूंचा विचार भाजप जितका करतो तितका अन्य कोणी खचितच करीत नसावा. अन्यथा अडाणींमध्ये इतका वेळ विरोधकांनी घालवला नसता. मनसेच्या पदरी पडलेले अपयश हा स्वतंत्र लेखाचा विषय आहे. एक मात्र नक्की की ठाकरे ब्रॅण्डचा बाजा वाजता-वाजता राहिला. या दोघा भावांना अजून एक संधी जरूर आहे, तिचा ते कसा उपयोग करतात हे पाहावे लागेल.
मुंबई महापालिकेसह २९ निवडणुकीचा राज्यातील राजकारणावर परिणाम होणार यात वाद नाही. त्यातही मुंबईचा अधिक. त्यामुळे शिंदे यांचे सल्लागार त्यांना काय मार्गदर्शन करतात हे पाहावे लागेल. ही कामगिरी फार उत्साहवर्धक नाही. शिंदे यांचा मुत्सद्दीपणा आणि गेल्या तीन-चार वर्षातील परिस्थितीचे अवलोकन यांचा वाटा अधिक असतो. किंबहुना शिंदे यांची दुसरी फळी कार्यरत होऊन आपल्या नेत्याचे राज्यातील पटलावरचे वजन कसे वाढेल हे पाहिला हवे. शिंदे यांनी त्यासाठी चमचे आणि गरम झालेल्या किटल्यांचे कडे तोडायला हवे.
एकीकडे राज्याचे राजकारण ढवळून निघत असताना श्री. शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यातील स्थितीचा अभ्यास करणे तितकेच गरजेचे आहे. संपूर्ण राज्यात शिवसेनेची एकत्रित मते ४८९ होती, ती ५५३ झाली आहेत. यापैकी शिंदे यांना ठाणे-पालघर (एमएमआर क्षेत्र) मध्ये १७७ जागा मिळाल्या तर उबाठाने ७७ अधिक मनसेच्या १३ अशा ९० जागा जिंकल्या. कोणती सेना खरी अशी चर्चा सुरू झाली आहे. परंतु एक मात्र नक्की की जागांमध्ये वाढ झाली आहे आणि त्यामुळे मराठी अस्मितेचा मुद्दा टोकदार भले झाला नसेल पण तो पुसला गेला नाही. भाजपाला प्राप्त झालेली मराठी मते ही प्रामुख्याने विकासावर आधारित होती. त्यातून मराठी-अमराठी वाद होऊन अखेर हिंदुत्वावर समझौता झाला.
ठाण्यामध्ये मात्र उबाठाची कामगिरी निराशाजनक झाली. त्यांचे नेते त्यावर विचारविनिमय करतील ही अपेक्षा आहे. अर्थात विपक्ष म्हणून एक आक्रमक चेहरा जनतेसमोर आणण्यासाठी त्यांना प्रयत्न करावे लागतील. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या पुण्याईचा लाभ उचलण्यात ते कमी पडले असाही एक निष्कर्ष निघतो. उबाठा जितकी ‘दिसायला’ हवी किंवा ‘जाणवायला’ हवी तसे झाले नाही, हे कटू सत्य मान्य करून पुढे जावे लागेल. कै. दिघे यांच्या शक्तिस्थळावर सर्व नेत्यांनी आणि पराभूत उमेदवारांनी शांतपणे आत्मपरीक्षण केले तर त्यांना कदाचित उत्तर सापडेलही. ठाणे पुन्हा एकदा राज्याच्या राजकीय पटलावर आले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही एका नव्या व्युहरचनेची आखणी करावी लागणार. निवडणुकीदरम्यान आम्ही विश्लेषण करताना शिंदे यांच्यासाठी ही ‘सेमी-फायनल’ असा इशारा दिला होता. तो खरा ठरू लागल्याचे संकेत येऊ लागले आहेत. गाठ अखेर फडणविस नावाच्या आश्वासक चेहऱ्याशी आहे. केंद्रीय नेतृत्व या घडामोडींकडे लक्ष ठेवून आहे. व्यापक विचार केला तर फडणविसांचे पाऊलही मराठीच मानावे लागेल. ते कसे पुढे पडेल याचाही यानिमित्ताने विचार व्हावा. तीन पायांची शर्यत धावण्यापेक्षा सोबत धावणे शिंदे यांनी पसंत केले आहे. पण भाजप अशा शर्यतीत किती मागे टाकेल हे सांगता येणार नाही.