‘नागपूर स्टेशनला फिरायला…’

संजय राऊतांच्या टीकेला फडणवीसांचे एका वाक्यात उत्तर

मुंबई: राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राम मंदिर प्राणप्रतिष्ठेच्या पूर्वसंध्येला आज सकाळी एक्स अकाऊंटवर कार सेवेसाठी नागपूर रेल्वे स्थानकावरून अयोध्येला जातानाचा एक फोटो शेअर केला. त्या फोटोनंतर शिवसेना उबाठा गटाचे नेते संजय राऊत यांनी टीका केली. “तुम्ही नागपूर स्टेशनवरून पुढे पोहचला का? आपण सगळे नागपूर स्टेशनला फिरण्यासाठी गेला असाल. पण, आमच्याकडे प्रत्यक्ष बाबरीच्या घुमटावरील फोटो आहेत”, अशी टीका संजय राऊत यांनी केली होती.

यानंतर देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न माध्यमांनी केला. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर देण्यास नकार दिला. तसेच हा फोटो त्यांनी आज सोशल मीडियावर शेअर का केला? याचेही उत्तर दिले.

नागपूर येथे माध्यमांशी बोलत असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका वाक्यात संजय राऊतांच्या टीकेला उत्तर दिले. ते म्हणाले, “मी मुर्खांना उत्तर देत नाही. त्यामुळे माझी प्रतिक्रिया हे उत्तर समजू नये. नागपूरहून प्रकाशित होणारे नवभारत या दैनिकाच्या संपादकांनी त्यावेळेसचा अंक मला पाठविला. ते म्हणाले, तुम्ही कारसेवेला गेला होतात, त्यावेळचा फोटो आमच्या फोटोग्राफरने काढला होता. त्यांचे आभार मानण्यासाठी मी ट्विट केले आहे. त्यावेळेसच्या परिस्थितीची आठवण मला झाली. त्या आनंदात मी एक्सवर पोस्ट केली होती.”

“माझी पोस्ट कुणालाही प्रत्युत्तर देण्यासाठी नव्हती. मी उत्तर देण्याच्या भानगडीत पडत नाही. कारण ज्या लोकांनी अस्तित्व नाकारले होते, प्रभू राम त्याच ठिकाणी जन्माला आले होते का? अशा प्रकारचा प्रश्न विचारला होता, त्यामुळे जे लोक रामालाच मानायला तयार नाहीत, त्यांना मी उत्तर कशाला देऊ? मी मुर्खांना उत्तर देत नाही”, असेही देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.

सरकार म्हणून आम्ही उद्या २२ जानेवारी रोजी अयोध्येत जाणार नाही. फेब्रुवारी महिन्यात अयोध्येत जाऊन राम सेवा करेल, अशीही प्रतिक्रिया यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी दिली. दरम्यान आज सकाळी पत्रकारांशी संवाद साधताना संजय राऊत म्हणाले, “देवेंद्र फडणवीसांनी शिवसेनेच्या बाबरी पतनाच्या सहभागाविषयी प्रश्न उपस्थित केले आहेत. हा अत्यंत हास्यास्पद आणि पोरकट प्रयत्न आहे. अयोध्येतील लढ्यात शिवसेनेच्या योगदानाबद्दल प्रश्न विचारणे कोत्या मनोवृत्तीचं लक्षण आहे. अयोध्येतील कारसेवेत सहभागी झालेल्या शिवसैनिकांचा नाशिकमध्ये सत्कार आणि सन्मान करणार आहोत.”