रमझाननिमित्त आखाती देशात मागणी वाढणार
नवी मुंबई : वाशीतील कृषी उत्पन्न बाजारसमितीच्या फळ बाजारात हापूस आंब्याची आवक वाढतच परदेशातून देखील हापूसची मागणी वाढली आहे. सध्या बाजारात कोकणातून सात ते आठ हजार पेट्या तर कर्नाटक, केरळमधून चार ते पाच हजार क्रेट दाखल होत आहेत. यातील कोकणातील ४०टक्के आंबा युरोप आणि आखाती देशात निर्यात होत आहे. लवकरच रमजान महिना सुरू होणार असल्याने आखाती देशात हापूसच्या मागणीत आणखी वाढ होणार असल्याची माहिती येथील व्यापाऱ्यांनी दिली.
हापूस आंब्याची चव सर्वांनाच आवडते. ज्याप्रमाणे भारतीयांना हापूस आंब्याने भुरळ घातली आहे, त्याचप्रमाणे परदेशी नागरिकांना देखील हापूसच्या चवीने भुरळ घातली आहे. त्यामुळे कोकणातील हापूस आंब्याला परदेशात मागणी वाढत आहे.
यंदा आंब्याच्या मुख्य हंगामाला अजून सुरुवात झाली नसली तरी बाजारात दिवसेंदिवस आवक वाढत चालली आहे. सध्या कोकणातून सात ते आठ हजार पेट्या तर कर्नाटक, केरळमधून चार ते पाच हजार क्रेट दाखल होत आहेत. त्यामुळे बाजारात आंबा दाखल होत असल्याने परदेशात देखील मागणी वाढू लागली आहे. या आंब्यावर प्रकिया करून युरोप आणि आखाती देशात हवाई आणि सागरीमार्गे निर्यात केला जात आहे.
आता लवकरच रमजान महिना येत असल्याने आखाती देशात आंब्याच्या मागणीत सरासरीपेक्षा अधिक वाढ होणार असल्याची शक्यता आहे. आता आवक होत असलेल्या आंब्यापैकी ४०टक्के आंबा निर्यात होत आहे, अशी माहिती येथील आंबा विक्रेत्यांनी दिली.