पाण्यासाठी मुंबईकडून अपेक्षा; विकासाबाबत शहापूरची उपेक्षाच

शहापूरचा एमएमआरडीएमध्ये समावेश करण्याची बरोरा यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

शहापूर: नवीन ठाणे जिल्ह्यातील एकमेव आदिवासी व दुर्गम तालुका असलेल्या शहापूर तालुक्याचा मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) मध्ये समावेश करण्यात यावा, अशी मागणी शहापूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार पांडुरंग बरोरा यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन यांच्याकडे केली आहे.

शहापूर तालुका हा भौगोलिकदृष्ट्या ठाणे जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका असून, तानसा, भातसा व वैतरणा या महत्त्वाच्या धरणांमधून मुंबई व उपनगरांना मोठ्या प्रमाणात पाणीपुरवठा केला जातो. मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या पाणीपुरवठा योजनेतील जलवाहिन्या या तालुक्यातून जात असताना देखील, विकासाच्या बाबतीत शहापूर तालुका आजही मागे पडलेला आहे, अशी खंत माजी आमदार बरोरा यांनी निवेदनात व्यक्त केली आहे.

शहापूर तालुक्यात वासिंद, आसनगाव, आटगाव, तानशेत, खर्डी, उंबरमाळी व कसारा ही सात रेल्वे स्थानके असून, या ठिकाणांहून दररोज हजारो नागरिक रोजगारासाठी मुंबई, ठाणे व कल्याण परिसरात प्रवास करतात. तसेच शहापूर तालुका हा मुंबई-नाशिक राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३ व समृद्धी महामार्ग यांच्यामधील महत्त्वाचा मध्यवर्ती भाग असल्याने वाहतूक व लोकसंख्या वाढ झपाट्याने होत आहे. तरीही मुंबई महानगर प्रदेश विकास आराखड्यात शहापूर तालुक्याचा समावेश नसल्याने, औद्योगिक, शैक्षणिक, आरोग्य व पायाभूत सुविधांच्या विकासावर मर्यादा येत आहेत. शासनाने जाहीर केलेल्या ठाणे-पालघर-रायगड प्रादेशिक विकास योजनेत शहापूरचा समावेश असल्याचे नमूद असले, तरी अंतिम अधिसूचनेत शहापूर तालुका वगळण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे.

मुंबईला पाणीपुरवठा करणारी धरणे, मुंबई महानगराचा विस्तार, तसेच भविष्यातील नागरीकरण लक्षात घेता शहापूर तालुक्याचा एमएमआरडीएच्या कार्यक्षेत्रात समावेश करणे अत्यंत आवश्यक असल्याचे आमदार बरोरा यांनी स्पष्ट केले आहे. यामुळे शहापूर तालुक्याच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळेल व स्थानिक नागरिकांना रोजगार, सुविधा व पायाभूत विकासाच्या अधिक संधी उपलब्ध होतील.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन या विषयाकडे सहानुभूतीपूर्वक व सकारात्मक दृष्टीकोनातून विचार करून शहापूर तालुक्याचा एमएमआरडीएमध्ये समावेश करावा, अशी विनंती केली. याबाबत ते सकारात्मक राहतील, असा विश्वास माजी आमदार पांडुरंग बरोरा यांनी व्यक्त केला आहे.