निमित्त डोंगरावरील आगीचे; ठाण्यात प्रवेश वनमंत्र्यांचा!

मामा-भांजे डोंगरावरील आगीची चौकशी करा-मनसे

ठाणे: संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हद्दीतील मामा-भांजे डोंगर परिसरात लागलेल्या भीषण आगीची चौकशी करण्याची मागणी मनसेचे संदीप पाचंगे यांनी केली आहे. ही आग लावण्यात आल्याचा संशय मनसेने व्यक्त केला आहे. दरम्यान ही मागणी वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडे करण्यात आल्याने त्यांच्या ठाण्यातील प्रवेशाला जनता दरबारऐवजी आगीची घटना निमित्त ठरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

दोन दिवसांपूर्वी ठाण्यातील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान परिसरातील मामा-भांजे डोंगरावर भीषण आग लागल्याने शेकडो झाडे भस्मसात झाली आहेत. हा भाग संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या संरक्षित क्षेत्रात मोडत असून, येथे अनधिकृत बांधकामे आणि घुसखोरीचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. मामा-भांजे डोंगर परिसरात अनेक गर्दुल्ले आणि अनधिकृतपणे राहणारे लोक नशा करत असल्याचे वारंवार निदर्शनास आले आहे.

मनविसेने अनेक वेळा वनविभागाकडे तक्रारी केल्या असल्या, तरी त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. यापूर्वी मनसेचे संदीप पाचंगे यांनी वनविभागाच्या सुमारे १२०० चौ. मीटर जागेवर झालेल्या अनधिकृत बांधकामांच्या विरोधात तक्रार केली होती. त्यानंतर वनविभागाने गुन्हा दाखल केला, मात्र राजकीय दबावामुळे कारवाई पूर्णत्वास जाऊ शकली नाही. परिणामी, या भागातील अनधिकृत बांधकामांचा सुळसुळाट झालेला दिसून येत असल्याचे पाचंगे यांनी सांगितले. याचबरोबर वनविभागाच्या अहवालानुसार, मामा-भांजे दर्ग्याच्या शेजारी नव्याने उभारण्यात आलेले ४०० चौ. मीटरचे कब्रस्तान अधिकृत नाही. ठाणे शहराच्या हद्दीत कब्रस्तानाच्या सुविधांची कमतरता असल्यास, त्याचा उपाय शोधण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. मात्र, राष्ट्रीय उद्यानाच्या संरक्षित क्षेत्रात अनधिकृत कब्रस्तान उभारले जाणे कायद्याच्या दृष्टिकोनातून चुकीचे असल्याचेही त्यांनी सांगितले.

दोन दिवसांपूर्वी डोंगरावर लागलेल्या आगीत मोठ्या प्रमाणात झाडे बेचिराख झाली. ठाणे महापालिकेने काही वर्षांपूर्वी मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड केली होती. या आगीत वनसंपदा उद्ध्वस्त झाली आहे. विशेष म्हणजे ही आग लागली नसून कोणी तरी जाणीवपूर्वक लावल्याचा संशय असून महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे सरचिटणीस संदीप पाचंगे यांनी या घटनेवर संताप व्यक्त करत झाडे जाळल्याच्या दुर्घटनेची चौकशी करून गुन्हा दाखल करण्याची मागणी वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. या मागणी निमित्ताने वनमंत्री म्हणून गणेश नाईक यांचा प्रवेश ठाण्याच्या राजकारणात होणार आहे. एकीकडे गणेश नाईक यांच्या जनता दरबारावरून वादंग माजला असताना आगीच्या घटनेचे निमित्त ठाण्यातील राजकारण ढवळून निघणार असल्याची शक्यता व्यक्त होत आहे.

राष्ट्रीय सुरक्षिततेला धोका; वायुसेनेची तक्रार
एअर फोर्स स्टेशनच्या नजीक असलेल्या कान्हेरी हिल परिसरातील मामा-भांजे दर्ग्याच्या आसपास काही अनोळखी लोक स्थलांतरित झाले आहेत. यामुळे राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टिकोनातून मोठा धोका निर्माण झाला आहे. भारतीय वायुसेनेच्या अधिकाऱ्यांनीही या संदर्भात पत्राद्वारे तक्रार नोंदवली होती. राष्ट्रीय उद्यानाच्या हद्दीत होणारी अनधिकृत वसाहत आणि वाढती लोकसंख्या सुरक्षा यंत्रणांसाठी चिंतेचा विषय बनली आहे.