येथील उत्पादन शुल्क विभागाने २०२२-२३ या आर्थिक वर्षात सरस कामगिरी केली असून, सुमारे ११ कोटी ७८ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. तब्बल २,१३५ आरोपींना अटक करून १२३ वाहने जप्त करण्यात आली. शिवाय गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा सुमारे दीड कोटी रुपयांचा मुद्देमाल अधिक मिळवला आहे.
ठाणे जिल्ह्यात अवैध मद्य विक्रीला आळा बसण्यासाठी ठाणे एक्साईज विभागाने कडक धोरण अवलंबले आहे. त्यात गावठी दारू आणि परराज्यातील मद्य आणून तिची सर्रास विक्री करणे असे गैरप्रकार रोखण्यात येणार आहेत. अशा ३,१७३ गुन्ह्यांची नोंद केली आहे, असे उत्पादन शुल्क विभागाचे विभागीय अधीक्षक डॉ. निलेश सांगडे यांनी सांगितले.
अवैध दारू विक्रीची माहिती मिळते त्यावेळी विभागाची जिल्ह्यात ठाणे (ए,बी,सी, डी, एफ), डोंबिवली, कल्याण, भिवंडी, उल्हासनगर आणि अंबरनाथ येथे असलेल्या पथकांकडून सक्त कारवाई करण्यात येते. यावर्षी २०१४ वारस आणि ११५९ बेवारस असे ३,१७३ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर २०२१-२२ या वर्षात २८९६ गुन्हे दाखल करण्यात आले होते.
सन २०२१-२२ मध्ये १८९६ आरोपींना अटक केली होती. एकूण मुद्देमालामध्ये २०२२-२३ या आर्थिक वर्षात एक कोटी ५५ लाख रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.
दारू विक्री व्यवसायात मोठा नफा मिळतो. त्यामुळे छुप्या पद्धतीने चोरटी विक्री करण्यात येते. अशा दारू विक्रीला प्रतिबंध घालण्यासाठी उत्पादन शुल्क विभागाकडून वर्षभर कारवाई सुरू असते. ठाणे जिल्ह्यात गावठी दारू, दीव-दमण, गोवा या परराज्यांतून येणा-या मद्यावर पाळत ठेवून विभागाकडून अनेक गुन्हे उघडकीस आणले आहेत.
ठाणे जिल्ह्यात मद्यविक्री मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे शासनाचा महसूल बुडवण्यासाठी काही विक्रेते परराज्यांतील स्वस्त मद्य ठाण्यात आणतात. त्याची विक्री करण्यासाठी बंदी आहे. तरीही दारू अन्य मार्गांनी आणली जात असल्यामुळे ‘एक्साईज’चे अधिकारी आणि कर्मचारी सतत पाळत ठेवून कारवाई करतात.
परराज्यातील चोरट्या मद्यविक्रीवर कारवाई करताना वाहनाचा किंवा आरोपींचा पाठलाग करावा लागतो. जंगलांमध्ये किंवा खाडी किनारी गावठी दारू तयार केली जाते. अशा ठिकाणी विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी यांच्या जीवावर बेतण्याचे प्रसंग घडतात. तरीही ते मागे हटत नाहीत, असे डॉ. निलेश सांगडे म्हणाले.