दा. कृ.सोमण यांनी इस्त्रोच्या कामगिरीची ठाणेकरांना दिली माहिती
ठाणे: आयत्यावेळी विक्रम लॅन्डरवरील सेन्सर्स किंवा मोटर्स बंद पडल्या असत्या तरीही विक्रम लॅन्डरचे ‘सॉफ्ट लॅन्डिग’ झाले असते अशी तयारी शास्त्रज्ञांनी ठेवली होती, अशी माहिती ज्येष्ठ खगोल अभ्यासक दा. कृ.सोमण यांनी दिली.
ठाणे नौपाडा येथील हितवर्धिनी संस्थेतर्फे रविवारी खगोल अभ्यासक दा.कृ.सोमण यांचे चंद्रयान-3 या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी विज्ञानप्रेमींनी गर्दी केली होती. प्रारंभी श्री. सोमण यांनी मोठ्या पडद्यावर इस्रोची कामगिरी दाखविली. डॉ. होमी भाभा आणि डॉ. विक्रम साराभाई यांचे इस्रो स्थापनेमध्ये मोठे योगदान असल्याचे सांगितले. आर्यभट्ट उपग्रह, भारतीय दलातील लढाऊ वैमानिक हवाई राकेश शर्मा यांची अंतराळ सफर, चंद्रयान-1, मंगळयान, एकाच रॉकेटद्वारे 104 उपग्रह अंतराळात सोडण्याचा विक्रम, चंद्रयान-2 आणि चंद्रयान-3 चे यश याची माहिती सांगितली.
23 ऑगस्टला संपूर्ण जगाचे लक्ष इस्रोच्या या मोहिमेकडे लागले होते. विक्रम लॅन्डर चंद्राच्या दक्षिणध्रुव प्रदेशात यशस्वीपणे उतरला आणि चंद्राच्या दक्षिण ध्रुव प्रदेशात यान उतरविणारा भारत हा पहिला देश ठरला. आयत्यावेळी विक्रम लॅन्डरवरील सेन्सर्स किंवा मोटर्स बंद पडल्या असत्या तरीही विक्रम लॅन्डरचे ‘सॉफ्ट लॅन्डिग’ झाले असते अशी तयारी शास्त्रज्ञांनी ठेवली होती. आयत्यावेळी उतरण्याची जागा बदलावी लागणे, प्रज्ञान रोवर विक्रम लॅन्डरवरून बाहेर काढणे, प्रज्ञान रोवरच्या मार्गात छोटी चांद्र विवरे येणे, केलेले संशोधन इस्रोच्या शास्त्रज्ञांपर्यंत येणे यात अनेक अडथळे आले, परंतु शास्त्रज्ञांनी यावर मात केली. चंद्रपृष्ठ भागावरील तापमान आणि चंद्रभमी खालील तापमान यात अपेक्षपेक्षा वेगळे घडत असल्याचेही इस्रोच्या शास्त्रज्ञांनी सांगितले आहे. विशेष म्हणजे नासा, युरोपियन स्पेस एजन्सीनेही इस्रोला मदत करण्याची तयारी दर्शविली होती. चंद्रयान-3 हे चंद्रयान-2 पेक्षा कमी खर्चात तयार करण्यात आले होते. या प्रगतीची मदत देशाच्या संरक्षण खात्यालाही होत असते हे श्री. सोमण यांनी सागितले.
भाषणाच्या शेवटी श्री. सोमण यानी श्रोत्याना चांद्रसफरही घडविली. चंद्रावरची अशनी विवरे व ज्वालामुखी विवरे कशी ओळखायची ते सांगितले. चंद्रावर वातावरण नाही तसेच गुरुत्त्वाकर्षण कमी आहे. चंद्रावरून आकाश काळे दिसते. सूर्याबरोबरच पृथ्वी, ग्रह, तारका दिसतात, पृथ्वी चौपट मोठी व तेजस्वी दिसते. पृथ्वीवर पौर्णिमा ती चंद्रावर अमावास्या, पृथ्वीवर अमावास्या ती चंद्रावर पौर्णिमा असते. पृथ्वीवरून चंद्रग्रहण ते चंद्रावरून सूर्यग्रहण, पृथ्वीवरून सूर्यग्रहण ते चंद्रावरून पृथ्वी ग्रहण दिसेल हे स्पष्ट केले.
पुढील 100 वर्षात स्पेस टुरिझम सुरू होईल, हिलीयम-3 सापडले तर ऊर्जा समस्या सुटेल वगैरे माहितीही त्यानी दिली.चंद्रयान-3 च्या यशामुळे तरुणवर्गात चैतन्य पसरले आणि इस्रोच्या शास्त्रज्ञांनी भारतीयांची मने जिंकून घेतली. ‘चंद्रयान-3’ या विषयावर व्याख्यानाच्या शेवटच्या टप्प्यात श्रोत्यांनी विचारलेल्या परग्रहावरील जीवसृष्टी, आदित्य एल-1 यान इत्यादी विषयांवरील प्रश्नांना श्री.सोमण यांनी समर्पक उत्तरे दिली.
वैशाली कारुळकर यांनी या व्याख्यानाचे सूत्रसंचालन केले. या कार्यक्रमाला हितवर्धिनी सभाचे अध्यक्ष प्रशांत नवरंगे आणि कार्यवाह अच्युत दामले हे उपस्थित होते.