रुग्णाच्या मृत्युनंतरही १० हजारांची औषधे मागवली?

मनसेचे अविनाश जाधव यांचा आरोप

ठाणे : कळवा रुग्णालयाचा भोंगळ कारभार पुन्हा समोर आला आहे. धर्मवीर आनंद दिघे हृदय उपचार केंद्रात उपचार घेणारा रुग्ण दगावल्यानंतरही दहा हजार रुपयांची औषधे मागवण्यात आल्याचा आरोप मनसेचे अविनाश जाधव यांनी केला आहे.

या प्रकरणी रुग्णाच्या नातेवाईकांनी मनसेच्या ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांच्याकडे तक्रार केल्यानंतर जाधव यांनी कळवा रुग्णालयात धाव घेतली. जाधव यांनी रूग्णालय प्रशासनाला जाब विचारत डॉक्टरांना धारेवर धरले. रुग्णाचा मृत्यू झाला तर औषधे का मागविण्यात आली असा सवाल उपस्थित करत जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही मृतदेह हातात घेणार नाही असा इशारा मनसेने दिला.

ठाणे महापालिकेच्या कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय नेहमीच वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. ठाण्यातील एका रुग्णाचे गेल्या काही दिवसांपासून कळवा रूग्णालयातील धर्मवीर आनंद दिघे हृदय उपचार केंद्रात उपचार सुरू होते. दरम्यान, कळवा रुग्णालयांत औषधे मोफत मिळत असताना देखील रूग्णालय प्रशासनाने नातेवाईकाकडे तब्बल १० हजार रुपयांची औषधे बाहेरून घेऊन या असे सांगितले. त्यांनतर संतापलेल्या नातेवाईकांनी सर्व प्रकार मनसे नेते अविनाश जाधव यांना सांगितला. या संदर्भात अविनाश जाधव यांनी घेतली कळवा रुग्णालयातील डॉक्टरांची भेट घेतली. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार रुग्णावर उपचार सुरू असताना सदरची औषधे मागवण्यात आली अशी उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली.

रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतरही औषधे का मागविण्यात आली. त्या औषांधाचा इतर रुग्णांना वापर होणार होता का ? आणि असे असेल तर रुग्णांची आणि नातेवाईकांची फसवणूक केली जात आहे. जो कोणी दोषी असेल त्यावर कारवाई करा. जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही मृतदेह हातात घेणार नाही असा इशारा मनसेने नेते अविनाश जाधव यांनी दिला.