उद्योजक मधुकरराव चक्रदेव यांचे निधन

डोंबिवली: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते आणि डोंबिवलीतील सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा, धार्मिक संस्थांचे मार्गदर्शक, उद्योजक मधुकरराव चक्रदेव यांचे सोमवारी सकाळी येथील राहत्या घरी निधन झाले. ते ८२ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते म्हणून मधुकर चक्रदेव यांची ओळख होती. कोकण प्रांताचे त्यांनी अनेक वर्ष नेतृत्व केले. डोंबिवली जिमखानाचे ते विश्वस्त होते. जिमखान्याच्या माध्यमातून अनेक क्रीडाविषयक उपक्रम राबविण्यात, जिमखान्यासाठी शासनाकडून मैदान मिळवून घेण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. स्वरतीर्थ सुधीर फडके स्मृती समिती, डोंबिवली नागरी अभिवादन समितीचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते.

गणेश मंदिराचे ते विश्वस्त होते. दरवर्षी आदिवासी दुर्गम भागातील वधू-वरांचे सामुहिक विवाह सोहळे घडवून आणण्यात चक्रदेव यांचा सक्रिय सहभाग होता. डोंबिवली परिसरातील शालेय विद्यार्थ्यांमधील कलागुणांना वाव मिळावा म्हणून ऑगस्टमध्ये ते स्पर्धा आयोजित करत. शहरातील सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा, धार्मिक संस्थांशी त्यांचा निकटचा संबंध होता. प्रत्येक संस्थेत, त्यांच्या सामाजिक कार्यात चक्रदेव यांचा समर्पित भावाने सहभाग होता. डोंबिवलीत काही वर्षांपूर्वी झालेल्या अखिल भारतीय नाट्य संमेलन, साहित्य संमेलनात प्रमुख मार्गदर्शक म्हणून उद्योजक मधुकर चक्रदेव यांनी भूमिका बजावली होती. विविध क्षेत्रांतील प्रतिष्ठित मंडळींनी मधुकर चक्रदेव यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले.