काय इंग्लंड महिला क्रिकेट संघ भारताला एकदिवसीय मालिका जिंकण्यापासून रोखेल?

बुधवारी साउथहॅम्प्टनमधील द रोझ बाउल येथे झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात 259 धावांचा पाठलाग करताना, भारतीय महिला क्रिकेट संघाने इंग्लंड महिला क्रिकेट संघाला चार विकेट्सने नमवले. 2006मध्ये दोनदा पराभव पत्करल्यानंतर आखिरकार भारताने साउथहॅम्प्टनमध्ये विजयाचा झेंडा फडकावला.

साउथहॅम्प्टननंतर आता ही एकदिवसीय मालिकेची मोहीम लंडनला जाऊन पोहोचली आहे. दोन्ही संघ दुसरा एकदिवसीय सामना खेळण्यासाठी लॉर्ड्स, अर्थात ‘होम ऑफ क्रिकेट’ येथे सज्ज आहेत. शनिवारच्या या चकमकीत इंग्लंडला ही तीन सामन्यांची मालिका जीवित ठेवण्यासाठी बाजी मारावीच लागेल. दुसरीकडे, भारत त्यांची विजयी घोडदौड पुढे नेण्यास उत्सुक असेल.

आमने-सामने

भारत आणि इंग्लंडने एकमेकांविरुद्ध एकूण 77 आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळले आहेत. त्यापैकी इंग्लंडने 40 तर भारताने 35 सामने जिंकले आहेत. इंग्लंडमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यांत इंग्लंड 24-10 ने आघाडीवर आहे. लॉर्ड्सवर, इंग्लंड आणि भारताने चार एकदिवसीय सामने खेळले आहेत. दोन्ही संघांनी दोन-दोन विजय नोंदवले आहेत.

संघ

इंग्लंड: नॅटली सिव्हर-ब्रंट (कर्णधार), माया बुशिये, सोफिया डन्कली, अ‍ॅलिस कॅप्सी, अ‍ॅलिस डेव्हिडसन रिचर्ड्स, टॅमी बोमाँट (यष्टीरक्षक), एम्मा लॅम्ब (यष्टीरक्षक), एमी जोन्स (यष्टीरक्षक), लॉरेन बेल, एमिली अर्लॉट, चार्ली डीन, सोफी एक्लस्टन, लॉरेन फायलर, लिंसी स्मिथ, केट क्रॉस

भारत: हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना, जेमिमा रॉड्रिग्ज, प्रतिका रावल, तेजल हसबनीस, रिचा घोष (यष्टीरक्षक), यास्तिका भाटिया (यष्टीरक्षक), हर्लिन देओल, दीप्ती शर्मा, स्नेह राणा, श्री चरणी, राधा यादव, अमनजोत कौर, अरुंधती रेड्डी, क्रांती गौड, सायली सातघरे

कोणत्या खेळाडूंवर लक्ष असेल

सोफिया डन्कली: भारताविरुद्ध या मालिकेतील पहिला एकदिवसीय सामना खेळत असताना या इंग्लंडच्या उजव्या हाताच्या मधल्या फळीतील फलंदाजाने तिचा वाढदिवस जोरदार साजरा केला. तिने 92 चेंडूत 83 धावा झळकावल्या ज्यात नऊ चौकारांचा समावेश होता. दरम्यान तिने अॅलिस डेव्हिडसन-रिचर्ड्ससोबत 100+ धावांची आणि सोफी एक्लस्टनसोबत 50+ धावांची भागीदारी केली.

सोफी एक्लस्टन: महिला एकदिवसीय क्रिकेटमध्ये जगात अव्वल क्रमांकावर असणाऱ्या या गोलंदाजाने भारताविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडसाठी सर्वात किफायतशीर गोलंदाजी केली. या डावखुऱ्या फिरकी गोलंदाजाने 10 षटकांत फक्त 34 धावा दिल्या. तिने एक निर्धाव षटकदेखील (21वे षटक हर्लिन देओलविरुद्ध) फेकले. तिने भारताची सलामीवीर प्रतिका रावलची विकेट घेतली, जी मोठ्या धावसंख्येसाठी सज्ज वाटत होती.

दीप्ती शर्मा: भारताच्या या दर्जेदार अष्टपैलू खेळाडूला पहिल्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडविरुद्धच्या त्या कठीण परिस्थितीत सहाव्या क्रमांकावर बढती देण्यात आली. या डावखुऱ्या फलंदाजाने 64 चेंडूत नाबाद 62 धावा केल्या आणि भारताला विजयाचा उंबरठा ओलांडण्यास मदत केली. गोलंदाजी करताना जरी तिने तिच्या 10 षटकांच्या स्पेलमध्ये एकही विकेट घेतली नसली तरी, फलंदाजी करताना मात्र त्याची अप्रतिम पद्धतीने भरपाई केली.

जेमिमा रॉड्रिग्ज: इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताच्या या मधल्या फळीतील फलंदाजाने शानदार कामगिरी बजावली. अर्धशतक जरी हुकले असले तरी तिच्या 48 धावांच्या खेळीने भारताच्या आशा जीवित ठेवल्या. रॉड्रिग्जने पाचव्या विकेटसाठी दीप्ती शर्मासोबत 90 धावांची महत्त्वाची भागीदारी केली. तसेच क्षेत्ररक्षण करताना तिने इंग्लंडची कर्णधार नॅटली सिव्हर-ब्रंटचा अविश्वसनीय झेल टिपून प्रभावित केले.

सामन्याची थोडक्यात माहिती

दिनांक: 19 जुलै 2025
वेळ: दुपारी 3:30 वाजता
ठिकाण: लॉर्ड्स, लंडन

प्रक्षेपण: सोनी स्पोर्ट्स नेटवर्क